Mumbai Apex Hospital Fire: मुलुंड येथील अ‍ॅपेक्स हॉस्पिटलमध्ये आग; सर्व रुग्णांना सुरक्षित बाहेर काढून इतर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

एकीकडे महाराष्ट्र कोरोना विषाणू (coronavirus) महामारीचा सामना करीत आहे, तर दुसरीकडे शासनासमोर रोज नवीन समस्या उभ्या राहत आहेत. आजच मुंबई व आजूबाजूच्या परिसरामध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर आता माहिती मिळत आहे सोमवारी (12 ऑक्टोबर) मुंबईतील मुलुंडच्या (Mulund) अ‍ॅपेक्स हॉस्पिटल (Apex Hospital) मध्ये पॉवर जनरेटरला आग लागली. आग लागल्याची घटना वेळीच रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या लक्षात आल्याने त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. मिळालेल्या माहितीनुसार, अ‍ॅपेक्स रुग्णालयात दाखल केलेले सर्व रुग्ण सुरक्षित आहेत.

आज मुंबई शहरात विजेची समस्या उद्भवल्याने रुग्णालयामध्ये जनरेटर चालू होता. झी 24 तासच्या वृत्तानुसार, मुलुंड भागात सायंकाळी उशिरापर्यंत परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला नव्हता मिळालेल्या माहितीनुसार जनरेटरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली असावी असे फायर ब्रिगेडने सांगितले. रुग्णालयाच्या आयसीयू वार्डामध्ये ही आग लागली व त्यानंतर धूर निघू लागला. त्यावेळी वॉर्डमध्ये 39 रुग्णांवर उपचार सुरु होते. आग लागल्याचे समजताच कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून ताबडतोब रुग्णांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले. फायर ब्रिगेडच्या मदतीने आगीवर नियंत्रण ठेवण्यात यश आले. इथून रुग्णांना बाहेर काढल्यानंतर आता त्यांच्यावर इतर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

एएनआय ट्वीट - 

दरम्यान, मुंबईमध्ये आज वीज पुरवठा खंडित झाल्याने हजारो रेल्वे प्रवासी वेगवेगळ्या ठिकाणी अडकले होते तसेच महाविद्यालयीन परीक्षांनाही विलंब झाला. या गोष्टीचा फटका शहरामधील जवळजवळ सर्वांच बसला आहे. विशेष म्हणजे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) या दोघांवरही या खंडित झालेल्या विजेचा परिणाम झाला नाही. (हेही वाचा: मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तातडीने चौकशीचे आदेश)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रीड अपयशामागील कारणे शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच येणाऱ्या चार दिवसात मुसळधार परतीच्या पावसाचा अंदाज असून यादृष्टीनेही वीजेच्या मागणीचा विचार करुन सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी दिले.