Baby Care Hospital Fire in Vivek Vihar | (Photo Credit -X)

दिल्ली (Delhi) पूर्व परिसरात असलेल्या विवेक विहार येथील मुलांच्या रुग्णालयाला शनिवारी (25 मे) रात्री लागलेल्या भीषण आगीत (Vivek Vihar Fire) सात नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली आहे. या घटनेनंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi), अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), सौरभ भारद्वाज (Saurabh Bhardwaj) यांच्यासह पालकांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ही घटना शाहदरा येथील न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटलमध्ये (Baby Care Hospital at Vivek Vihar) घडली. घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) बचाव कार्यासाठी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मात्र, आगीवर नियंत्रण मिळविण्यास काहीसा विलंब झाल्याने नवजात अर्भकांचा आणि बालकांचा मृत्यू झाला होता.

आगीत अडकलेल्या बारा नवजातांची सुटका

DFS अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आग रात्री 11:30 च्या सुमारास लागली. ज्यामुळे हॉस्पिटल आणि लगतच्या इमारतीस हानी पोहोचली. आगीत अडकलेल्या बारा नवजातांची सुटका करण्यात आली. त्यापैकी सहा जणांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल केल्यावर मृत घोषित करण्यात आले आणि एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर पाच अर्भकांना वेगळ्या रुग्णालयात वैद्यकीय सेवा दिली जात आहे.

घटनेचा प्रमुख तपशील

  • बेबी केअर न्यू बॉर्न हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री उशिरा आग लागली.
  • सहा नवजात बालकांना मृत घोषित करण्यात आले, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
  • शवविच्छेदन तपासणीसाठी मृतदेह जीटीबी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

दिल्ली पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, रुग्णालयाचा मालक आणि पश्चिम विहारचा रहिवासी नवीन कीची सध्या फरार आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 336 (जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणारे कृत्य) आणि 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. (हेही वाचा, Delhi Fire: दिल्लीत मोठी दुर्घटना, न्यू बॉर्न बेबी केअर रुग्णालयाला आग लागल्याने सहा शिशूंचा मृत्यू)

बालकांचे आईवडील, पालक विदीर्ण

प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची दाहकता अधिक विषद केली. एका नवजात बालकाची आई म्हणाली, "माझ्या मुलाला गेल्या तीन दिवसांपासून येथे दाखल करण्यात आले होते. माझ्या मुलाला फक्त ताप आला होता.." दुसऱ्या एका नातेवाईकाने निराशा व्यक्त करताना सांगितले, "काल आम्ही आमच्या मुलाला पाहिले... पण ते जीवंत नव्हते. आम्हाला इथे राहण्याची परवानगी दिली आहे... आम्हाला कोणतीही माहिती मिळत नाहीये... डीएनए चाचणीनंतर ते आमचे मूल आहे की नाही हे आम्ही ओळखू शकू..."

व्हिडिओ

आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांची प्रतिक्रिया

दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी रविवारी सकाळी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सांगितले की, "बारा नवजात बालकांना वाचवण्यात आले, परंतु दुर्दैवाने त्यातील सहा बालकांचा गुदमरून मृत्यू झाला. आणखी एका बालकाची प्रकृती गंभीर आहे. मी आरोग्य सचिवांना फोन करण्याचा प्रयत्न केला पण ते कॉलवर आले नाहीत. या प्रकरणात हॉस्पिटल मालकावर आम्ही अशी कठोर कारवाई करू की भविष्यात कोणीही असा निष्काळजीपणा करू नये."

व्हिडिओ

मुले गमावलेल्या पालकांसोबत आम्ही उभे- केजरीवाल

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शोक व्यक्त करताना म्हटले आहे की, "लहान मुलांच्या रुग्णालयातील आगीची ही घटना हृदयद्रावक आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपली निष्पाप मुले गमावली त्यांच्यासोबत आम्ही सर्वजण उभे आहोत."

एक्स पोस्ट

नरेंद्र मोदी यांना दु:ख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दु:ख व्यक्त करत असे म्हटले आहे की, "दिल्लीतील एका इस्पितळातील आगीची दुर्घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या अत्यंत कठीण काळात माझे विचार शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना मी करतो."

एक्स पोस्ट

आगीचे कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू असून, या दुःखद घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. रुग्णालयाचे मालक नवीन कीची याच्याविरोधात पोलीस सक्रियपणे कारवाई करत आहेत.