
जागतिक इलेक्ट्रिक वाहन (EV) निर्माता कंपनी टेस्ला लवकरच भारतात अधिकृत प्रवेश करणार असून, मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील मेकर मॅक्सिटी मॉलमध्ये मंगळवारी (15 जुलै) सकाळी आपल्या पहिल्या शोरूमचे उद्घाटन करणार आहे. काही दिवसांपूर्वी टेस्लाच्या भारत-केंद्रित अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून 'Coming Soon' असा संदेश देण्यात आला होता, ज्यात कंपनीचा भारतातील प्रवेश जुलै 2025 मध्ये होणार असल्याचे सूचित करण्यात आले होते.
टेस्लाच्या भारतातील योजनांबाबत अनेक तर्कवितर्क सुरू असताना, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी यापूर्वी जूनमध्ये स्पष्ट केले होते की सध्या टेस्लाची भारतात उत्पादन केंद्र उभारण्याची कोणतीही योजना नाही. “ते फक्त आपली कार भारतात विकू इच्छित आहेत. त्याव्यतिरिक्त सध्या कोणतीही प्रगती झालेली नाही,” असे ते म्हणाले होते. सध्या टेस्लाचे उद्दिष्ट केवळ भारतात शोरूम्स उभारण्यावर केंद्रित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
याआधी काही अहवालांमध्ये असेही म्हटले होते की टेस्ला भारतात कार आयात करून थेट विक्री करणार आहे आणि स्थानिक उत्पादनाची योजना सध्या तरी नाही. मात्र कंपनीने अद्याप आपल्या भारतातील कार्यपद्धतीबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
यावर्षीच्या सुरुवातीला टेस्लाने भारतात भरती प्रक्रिया सुरू केली, यामुळे कंपनी भारतात आपला प्रवेश दृढ करत असल्याचे संकेत मिळाले. टेस्ला प्रमुख एलोन मस्क यांनी याआधी भारतात गुंतवणुकीबाबत उत्सुकता व्यक्त केली होती, मात्र आयात शुल्क जास्त असल्याचे त्यांनी अडथळा असल्याचे सांगितले होते.
भारत सरकारच्या नवीन ईव्ही धोरणामुळे टेस्लासाठी मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. नव्या धोरणात आयात शुल्कात सवलत आणि जागतिक EV उत्पादकांसाठी आकर्षक प्रोत्साहनांची घोषणा करण्यात आली आहे.
टेस्लाकडून घोषणा
Coming soon pic.twitter.com/kquMXghCnK
— Tesla India (@Tesla_India) July 11, 2025
एप्रिल 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलोन मस्क यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली होती, ज्यात तंत्रज्ञान व नवकल्पनांवर सहकार्याबाबत संवाद झाला. याआधी फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिकेतील दौऱ्यात मस्क यांच्याशी प्रत्यक्ष भेटही झाली होती.
मुंबईतील शोरूमच्या लाँचसह टेस्ला भारतीय ग्राहकांच्या पसंतीची चाचपणी करणार असून, देशाच्या वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोबाईल बाजारपेठेत आपला ठसा उमठवण्याचा प्रयत्न करणार आहे. टेस्लाच्या प्रवेशामुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात स्पर्धा वाढण्याची, ईव्हीचा स्वीकार वाढण्याची आणि एक सशक्त ई-मोबिलिटी इकोसिस्टम तयार होण्याची शक्यता आहे.