
एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत, इलेक्ट्रिक वाहन (EV) निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी टेस्ला (Tesla) भारतात येऊ घातली आहे. अहवालानुसार कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या संयोजन केंद्रासाठी (Assembly Hub) सातारा हा एक पर्याय आहे. कंपनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात जमीन शोधत आहे. या प्रकल्पामुळे टेस्ला एप्रिल 2026 पर्यंत भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे प्रवेश करेल, अशी अपेक्षा आहे. हा प्रकल्प पूर्णपणे नॉकडाउन पद्धतीने कार्यान्वित होईल, ज्यामध्ये वाहनांचे सुटे भाग आयात करून स्थानिक पातळीवर त्यांचे संयोजन केले जाईल. या रणनीतीमुळे आयात कर कमी होऊन टेस्लाच्या वाहनांची किंमत भारतीय ग्राहकांसाठी परवडण्याजोगी होण्यास मदत होईल.
टेस्ला सातारा जिल्ह्यात सुमारे 100 एकर जागा शोधत आहे, जी पुणे-बेंगलुरू महामार्गालगत असावी. सातारा जिल्हा मुंबई आणि गोवा बंदरांशी तसेच रस्ते आणि रेल्वे नेटवर्कशी उत्तम प्रकारे जोडलेला आहे, ज्यामुळे वाहनांचे सुटे भाग आयात करणे आणि तयार वाहने वितरित करणे सोपे होईल. वाहनांचे सुटे भाग परदेशातून आयात करून ते इथे जोडल्याने पूर्णपणे तयार वाहनांवर लागणारा 100 टक्के आयात कर टाळता येईल, आणि स्थानिक संयोजनामुळे वाहनांच्या किमती 25 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
टेस्लाने यापूर्वी हैदराबादस्थित मेघा इंजिनीअरिंग कंपनीसोबत संयुक्त उपक्रमासाठी चर्चा केली होती, परंतु ती यशस्वी झाली नाही. सध्या कंपनी अन्य भारतीय कंपन्यांशी चर्चा करत आहे, ज्यामध्ये जमीन खरेदी आणि प्रकल्पासाठी सहकार्याचा समावेश आहे. सातारा येथील ऑटो-कॉम्पोनेंट निर्माता कंपनी कूपर कॉर्पोरेशन्सच्या उपस्थितीमुळे आणि पुण्याच्या औद्योगिक परिसराच्या जवळीकीमुळे ही जागा टेस्लासाठी रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाची ठरू शकते.
टेस्ला एप्रिल 2026 पर्यंत भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने यापूर्वी मार्च 2025 मध्ये मुंबईतील बांद्रा-कुर्ला संकुल (BKC) येथे आयातित इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीसाठी पहिले शोरूम उघडण्यासाठी पाच वर्षांचा करार केला आहे. या शोरूमचे क्षेत्रफळ 4,003 चौरस फूट आहे, आणि पहिल्या वर्षासाठीचे भाडे सुमारे 4.46 लाख डॉलर आहे. याशिवाय, टेस्लाने मुंबईतील फिनिक्स मार्केट सिटी, कुर्ला येथे नवीन कार्यालय उघडले आहे आणि दिल्ली, मुंबई आणि पुणे येथे 30 हून अधिक पदांसाठी नोकरभरती सुरू केली आहे. (हेही वाचा: Electric Vehicles: इलेक्ट्रिक वाहन खरेदीत राज्य सरकार देणार 10 टक्के सवलत; सर्व चारचाकी प्रवासी इ-गाड्यांना 'या' महामार्गांवर टोल माफ, जाणून घ्या सविस्तर)
टेस्लाचे सातारा इथे त्यांचा प्रकल्प स्थापन करण्याचे निश्चित झाल्यास, भारताच्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी नक्कीच फायदा होऊ शकेल. साताऱ्यातील संयोजन केंद्रामुळे, विशेषतः अभियांत्रिकी, तांत्रिक आणि व्यवस्थापन क्षेत्रात स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. यासह टेस्ला आपल्या सुपरचार्जर स्टेशन्सची भारतात स्थापना करणार आहे, ज्यामुळे दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि शहरी वापरासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा आत्मविश्वास वाढेल.
भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी टेस्ला स्थानिक उत्पादनावर लक्ष केंद्रित करणार आहे, ज्यामुळे भारत जागतिक इव्ही पुरवठा साखळीचा मोठा भाग बनेल. भारत सरकारने मार्च 2024 मध्ये नवीन इव्ही धोरण जाहीर केले, ज्यामुळे स्थानिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना आयात करात सवलत मिळेल. या धोरणानुसार, किमान 500 दशलक्ष डॉलर गुंतवणूक करणाऱ्या आणि तीन वर्षांत स्थानिक उत्पादन सुरू करणाऱ्या कंपन्यांना प्रीमियम इव्हीवर कमी आयात कर लागेल. टेस्लाच्या सातारा प्रकल्पाची योजना या धोरणाशी सुसंगत आहे, आणि कंपनीला याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.