Bangladesh Air Force चं ट्रेनिंग विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 19 जणांचा मृत्यू तर 70 अन्य जखमी असल्याचं समोर आलं आहे. हे विमान ढाका मध्ये शाळेच्या इमारतीवर कोसळलं आहे. चिनी बनावटीचं F-7 jet विमान Milestone School and College वर कोसळलं आहे. या घटनेच्या वेळेस मुलांचे वर्ग सुरू होते. समोर आलेल्या फूटेजमध्ये विमान कोसळल्यानंतर आग उसळल्याची आणि धूराचे लोट पसरल्याचं दिसत आहे. बचावकार्यानंतर जखमींना सहा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

Uttara भागात F-7 BGI training aircraft दुपारी सव्वा एकच्या सुमारास कोसळले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी विमानाच्या तुटलेल्या अवशेषांवर पाणी फवारले. हे विमान इमारतीच्या बाजूला आदळले, त्यामुळे लोखंडी ग्रिल्सचे नुकसान झाले आणि इमारतीला मोठे छिद्र निर्माण झाले, असे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तामध्ये म्ह्टलं आहे. मुख्य सल्लागाराचे आरोग्य विभागाचे विशेष सहाय्यक प्राध्यापक डॉ. मोहम्मद सय्यदुर रहमान यांनी सांगितले की, 48 जणांची प्रकृती गंभीर आहे.

समोर आलेल्या फोटोज मध्ये विद्यार्थी, त्यापैकी काहींना भाजलेल्या जखमा आणि भरपूर रक्तस्त्राव झालेले, गोंधळात इकडे तिकडे धावत असल्याचे दिसत आहे. "तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला मृत अवस्थेत आणण्यात आले आणि १२, १४ आणि ४० वयोगटातील तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले," असे ढाका मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील बर्न युनिटचे प्रमुख बिधान सरकार म्हणाले, जिथे काही पीडितांना नेण्यात आले होते.

रुग्णवाहिका सहज उपलब्ध नसल्याने, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की लष्कराच्या जवानांनी जखमी विद्यार्थ्यांना त्यांच्या हातात घेऊन रिक्षा व्हॅन आणि इतर वाहनांमधून हॉस्पिटल मध्ये दाखल केले.

बांगलादेश हवाई दलाने अपघाताची पुष्टी केली असली तरी, अपघाताचे कारण किंवा वैमानिक बाहेर पडला होता की नाही याचा उल्लेख केलेला नाही.