मुंबई: कलर्स मराठीवरील बहुचर्चित 'बिग बॉस मराठी 6' (Bigg Boss Marathi 6) या शोचा थरार पहिल्याच दिवसापासून सुरू झाला आहे. रितेश देशमुखच्या खुसखुशीत सूत्रसंचालनाने प्रेक्षकांची मने जिंकली असतानाच, आता पहिल्या आठवड्याचे नॉमिनेशन समोर आले आहे. या आठवड्यात तब्बल 8 स्पर्धकांना घराबाहेर जाण्याच्या धोक्याचा सामना करावा लागणार आहे.
'पतंग' टास्कने वाढवलं टेन्शन
पहिल्या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेसाठी बिग बॉसने 'पतंग' टास्क दिला होता. या टास्कमध्ये सदस्यांना एकमेकांच्या फोटो असलेले पतंग कापायचे होते. ज्या स्पर्धकाचे पतंग कापले गेले, ते या आठवड्याच्या एलिमिनेशनसाठी पात्र ठरले आहेत. या टास्क दरम्यान घरातील स्पर्धकांमध्ये मोठी चढाओढ आणि वादावादी पाहायला मिळाली.
हे 8 सदस्य आहेत 'डेंजर झोन'मध्ये
टास्कच्या शेवटी 8 सदस्यांची नावे समोर आली आहेत. यामध्ये प्रभू शेळके, राधा पाटील, करण सोनावणे, दीपाली भोसले सय्यद, रुचिता जामदार, अनुश्री माने, रोशन भजणकर आणि दिव्या शिंदे यांचा समावेश आहे. आता या आठवड्यात यापैकी कोणाचा प्रवास थांबणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
वादाची पहिली ठिणगी
नॉमिनेशन प्रक्रियेदरम्यान अभिनेत्री तन्वी कोलते आणि विनोदी अभिनेता सागर कारंडे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. तन्वीने सागरला 'शोसाठी योग्य नाही' असे म्हणत नॉमिनेट केले, ज्यावर सागरनेही जोरदार प्रत्युत्तर दिले. एरवी शांत स्वभावाचा वाटणारा सागर आक्रमक झाल्यामुळे घरातील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
'स्वर्ग-नरक' संकल्पनेचा प्रभाव
या वर्षी बिग बॉसने 'स्वर्ग आणि नरक' ही नवीन संकल्पना आणली आहे. दीपाली भोसले सय्यद आणि करण सोनावणे यांसारख्या स्पर्धकांनी 'शॉर्टकट' दारातून प्रवेश मिळवला होता, ज्यामुळे इतर सदस्यांनी त्यांना सुरुवातीलाच लक्ष केल्याचे दिसून आले.
आता या नॉमिनेट झालेल्या 8 सदस्यांचे भवितव्य प्रेक्षकांच्या हातात आहे. जिओ हॉटस्टार ॲपच्या माध्यमातून चाहते आपल्या आवडत्या स्पर्धकाला वाचवण्यासाठी मतदान करू शकतात. या आठवड्याचा निकाल रितेश देशमुख 'भाऊच्या धक्क्या'वर जाहीर करतील.