Eknath Shinde Health Update: महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या सातारा (Satara) येथील दरेगावात आहेत. आज ते मुंबई (Mumbai) ला परतणार आहेत. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतल्यानंतर ते शुक्रवार सातारातील त्यांच्या निवासस्थानी गेले होते. शनिवार, 30 नोव्हेंबर रोजी शिंदे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ताप आला होता. तथापि, डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रभावी उपचार केले असून सध्या त्यांची प्रकृती सुधारली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केली एकनाथ शिंदेंची चौकशी -
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एकनाथ शिंदे यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शिंदे हे गेल्या तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील त्यांच्या गावी आहेत. शिंदे रविवारी संध्याकाळी मुंबईत परतण्याची शक्यता आहे. शिंदे यांना शनिवारी ताप आल्याने डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली. शिंदे यांची प्रकृती खालावल्यानंतर विरोधकांनी शिंदेवर टिका केली आहे. शिंदे यांना ताप आणि घशाचा संसर्ग झाल्याचे त्यांचे फॅमिली डॉक्टर आरएम पार्टे यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. (हेही वाचा - Maharashtra CM: कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार? अजित पवारांनी दिली माहिती)
एकनाथ शिंदे यांना औषधे देण्यात आली असून त्यांला IV (औषधासाठी इंट्रा-व्हेनस थेरपी) वर ठेवण्यात आले आहे. दोन दिवसांत त्यांना बरे वाटेल. ते रविवारी मुंबईला रवाना होणार आहेत, असंही डॉ पार्टे यांनी म्हटलं आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास शिंदे हेलिकॉप्टरने ठाण्यातील त्यांच्या घरी पोहोचतील. (हेही वाचा - Eknath Shinde Health Update: एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली, डॉक्टरांचे पथक घरी पोहोचले)
संजय राऊत यांची एकनाथ शिंदेंवर टिका -
एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीवरून संजय राऊत यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. 'एकनाथ शिंदेंची प्रकृती नाजूक आहे. आपण सर्वांनी काल वृत्तवाहिन्यांवर पाहिलं की त्यांच्या हाताला पट्ट्या लावल्या होत्या. त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले तर ते मंत्र्यांना देखील भेटले नाहीत. ते 5 डिसेंबर रोजी नव्या सरकारच्या शपथविधीला येतील की नाही याबाबत देखील शंका आहे. कदाचित त्यांना एअर ॲम्ब्युलन्समधून आणावं लागेल,' असं टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.