Blinkit Virar Lift Incident | (Photo Credits: X)

पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिम (Virar West) येथील सीडी गौरव (CD Gurudev Building) इमारतीमध्ये 18 जुलै, 2025 रोजी घडलेल्या घृणास्पद प्रकारामुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले आहेत. ब्लिंकीट (Blinkit) या क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मशी संबंधित एका डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हने रहिवासी इमारतीच्या लिफ्टमध्ये लघुशंका (Blinkit Virar Lift Incident) केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत स्पष्ट दिसून आला. हा भाग मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रकार स्पष्ट

लिफ्टमधील सीसीटीव्ही फुटेजनुसार डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह डाव्या हातात पार्सल घेऊन लिफ्टमध्ये प्रवेश करतो. नंतर तो कॅमेऱ्यापासून पाठमोरा उभा राहून चेन उघडतो आणि लिफ्टच्या कोपऱ्यात लघुशंका करतो. फुटेज पाहता तो कॅमेऱ्याची जाणीव ठेवून कृती लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. हा प्रकार शुक्रवारी दुपारी घडल्याचे सांगितले जाते. त्याच दिवशी पुढे लिफ्टमध्ये दुर्गंधी व अस्वच्छता जाणवल्याने रहिवाशांनी शंका घेत सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासले आणि Blinkit-ब्रँडेड जॅकेट घातलेल्या व्यक्तीची ओळख पटवली.

रहिवाशांनी Blinkit कार्यालय गाठले; आरोपीला पोलिसांकडे दिले

फुटेज पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या काही रहिवाशांनी जवळच्या Blinkit कार्यालयात जाऊन संबंधित डिलिव्हरी कर्मचाऱ्याची ओळख पटवली. तिथे त्याला पकडून (काहींनी ढकलाढकली केल्याचा आरोप) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

खालील घटना आपणास अस्वस्थ करु शकते

Bolinj Police Station येथे तक्रार

विरार पश्चिम येथील बोळींज पोलीस स्टेशन येथे औपचारिक तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रार स्वीकारल्याची पुष्टी केली असून तपास सुरू असल्याचे सांगितले. Blinkit कडून अधिकृत निवेदन अद्याप प्राप्त झालेले नाही; मात्र कंपनी अंतर्गत पातळीवर कारवाई करू शकते, अशी माहिती समोर येत आहे.