PM Modi | X @ANI

मुंबई: भारत सरकारच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने 'इंडिया मेरिटाइम वीक 2025' हा भारतीय सागरी सप्ताह मेळावा, 27 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत, मुंबईत गोरेगावच्या नेस्को मैदान येथे आयोजित केला आहे. हा कार्यक्रम जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा सागरी मेळावा ठरणार असून, त्यात सागरी क्षेत्रातील विविध प्रमुख हितधारक एकत्र येणार आहेत. 'महासागरांची एकजूट, समान सागरी दृष्टिकोन' या संकल्पनेवर आधारित इंडिया मेरिटाइम वीक 2025 या कार्यक्रमात, भारताच्या सागरी धोरणाचा आणि नील अर्थव्यवस्थेमधील योगदानाचा आढावा घेतला जाईल आणि त्यातून भारत, जागतिक सागरी केंद्र आणि नील अर्थव्यवस्थेमध्ये आघाडीचा देश म्हणून कसा उदयास येऊ शकतो, हे स्पष्टपणे दाखवले जाईल.

या पाच दिवसीय कार्यक्रमाचे उद्‌घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी हे देखील उपस्थित राहणार आहेत.

11 देशांचे परराष्ट्र मंत्री त्यांच्या उद्योग शिष्टमंडळांसह विविध सत्रांमध्ये सहभागी होणार आहेत. हा सहभाग भारताच्या सागरी क्षेत्रातील वाढत्या जागतिक स्वारस्याचे प्रतीक आहे.

“इंडिया मेरिटाइम वीक हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर तो भारताला जागतिक सागरी केंद्र म्हणून स्थान देईल, हरित आणि शाश्वत सागरी वाहतुकीला प्रोत्साहन देईल आणि आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार तसेच संपर्क व्यवस्था वाढवेल”, असे बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले.

भव्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व

'इंडिया मेरिटाइम वीक 2025 मध्ये 85 हून अधिक देश आणि 1 लाखाहून अधिक प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. जागतिक सागरी उद्योगातील दिग्गज, आंतरराष्ट्रीय संस्था आणि धोरण तज्ञ उपस्थित राहणार आहेत. तसेच, विविध राज्यांचे मंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल देखील यात सहभागी होतील. ते आपापल्या राज्यांमधील गुंतवणुकीच्या संधी आणि प्रादेशिक सागरी सामर्थ्य मांडतील.

पंतप्रधानांचे संबोधन आणि धोरणात्मक चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग हे इंडिया मॅरिटाइम वीक 2025 मधील प्रमुख आकर्षण असणार आहे. ते 29 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी एका विशेष पूर्ण सत्रात देशवासीयांना, सागरी क्षेत्रातील आघाडीच्या नेत्यांना आणि इतर भागधारकांना संबोधित करतील.

या संबोधनाबरोबरच, पंतप्रधान सागरी क्षेत्रातील जगभरातील आघाडीच्या निवडक कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत एका उच्चस्तरीय जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचे अध्यक्षस्थानही भूषवणार आहेत.

अभूतपूर्व उद्योग आणि गुंतवणुकीच्या संधी

इंडिया मॅरिटाइम वीक 2025 हे उद्योग कौशल्य आणि धोरणात्मक संवादाचे केंद्र बनण्यासाठी सज्ज असून या आयोजनात 350 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय वक्ते सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात 10 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या वचनबद्धतेसह, 600 पेक्षा जास्त सामंजस्य करार केले जाणार आहेत.

व्यापक प्रदर्शन आणि विविधांगी परिषदा

इंडिया मॅरिटाइम वीक 2025 मध्ये 400 पेक्षा अधिक प्रदर्शक सहभागी होणार असून, हे सर्व प्रदर्शक व्यापक प्रदर्शने मांडतील. त्यासोबतच परिषदांची विस्तृत मालिकाही आयोजित केली जाणार आहे. इंडिया मॅरिटाइम वीक 2025 मध्ये 12 पेक्षा जास्त प्रमुख कार्यक्रम आयोजित केले जातील. यात चौथी जागतिक सागरी भारत शिखर परिषद, क्वॉड देशांची भविष्यातील बंदरे ही परिषद, सागरमंथन - द ग्रेट ओशियन्स डायलॉग, शीईओ परिषद (SheEO Conference), संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोग आशिया-प्रशांत क्षेत्र संवाद आणि इतर अनेक आयोजनांचा समावेश आहे. या कार्यक्रमाअंतर्गत नॉर्वे, नेदरलँड्स, डेन्मार्क आणि स्वीडन या 4 देशांची विशेष सत्रेही होणार आहेत, याशिवाय महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, आसाम तसेच अंदमान आणि निकोबार यांचा समावेश असलेल्या 11 राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या सत्रांचेही आयोजन केले जाणार आहे.