Dev Diwali 2025: सध्या ज्या 'देवदिवाळी'ची चर्चा आहे, ती प्रामुख्याने उत्तर भारतीयांची देवदिवाळी आहे, जी त्रिपुरी पौर्णिमेला साजरी केली जाते. आपल्या महाराष्ट्रातील देवदिवाळी वेगळी आहे. हा फरक प्रामुख्याने पंचांग पद्धतीमुळे आणि प्रादेशिक महत्त्वानुसार येतो. अमावस्या संपल्यावर दुसऱ्या दिवसापासून नवीन महिना सुरू होतो. दोन्ही पद्धती एकाच चांद्र महिन्याला वेगवेगळ्या दिवसांपासून मोजायला सुरुवात करतात, ज्यामुळे पंचांगानुसार १५ दिवसांचा फरक दिसतो. मात्र, चतुर्थी, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या यांसारख्या तिथी संपूर्ण भारतात एकाच वेळी साजऱ्या होतात.
प्रांतवार देवदिवाळी साजरी करण्याची कारणे
उत्तर भारतीय देवदिवाळी त्रिपुरी पौर्णिमेला भगवान महादेवाने त्रिपुरासुर नावाच्या दैत्याचा वध केला. हा दैत्यावर मिळवलेला विजयोत्सव म्हणून ते 'देवदिवाळी' साजरी करतात. महाराष्ट्रात, विशेषतः कोकणप्रांतात, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला देवदिवाळी साजरी होते. याच दिवसापासून खंडोबाचे षडरात्र (सहा दिवसांचा उत्सव) सुरू होते आणि चंपाषष्ठीला तो संपतो. हा उत्सव 'देवदिवाळी' म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्रात देवदिवाळी कधी असते?
महाराष्ट्रात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला 'देवदिपावली' किंवा 'देवदिवाळी' हा सण असतो. २०२५ ची तारीख २१ नोव्हेंबर २०२५ पासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. त्यामुळे याच दिवशी (प्रतिपदेला) यंदाची देवदिवाळी साजरी केली जाईल.
महत्त्वाचे कारण
आपण कार्तिक महिन्यात जी दिवाळी साजरी करतो, तेव्हा चातुर्मास सुरू असतो आणि भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात. कार्तिक शुक्ल एकादशीला (प्रबोधिनी एकादशी) विष्णू जागे होतात आणि चातुर्मास संपतो. म्हणूनच, मार्गशीर्ष महिन्यात सर्व देव-देवतांचे स्मरण करण्यासाठी ही खास देवांची दिवाळी साजरी करण्याची प्रथा आहे.
'तेहतीस कोटी देव' म्हणजे काय?
'तेहतीस कोटी देव' या संकल्पनेत 'कोटी' या शब्दाचा अर्थ मराठीतील 'संख्या' नसून संस्कृतमध्ये 'प्रकार' असा आहे. ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ देवांना कार्यभार सोपवले आहेत. यात ८ वसू, ११ रूद्र, १२ आदित्य, १ इंद्र आणि १ प्रजापती असे एकूण ३३ प्रकारचे देव येतात. या सर्व ३३ प्रकारच्या देवांचे स्मरण करणे हाच देवदिवाळीचा हेतू असतो.
अशी साजरी करतात देवदिवाळी
कोकण प्रांतात या सणाला 'देवांचे नैवेद्य' असेही म्हणतात, कारण या दिवशी विविध देवतांना नैवेद्य अर्पण केला जातो.
- पूजा आणि दिवे: देव्हाऱ्यात तेला-तुपाचे दिवे लावले जातात. देवांना पंचामृताचा अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने स्नान घातले जाते.
- नैवेद्य: घरातील कुलदेवता, इष्टदेवता यांसह स्थानदेवता, वास्तुदेवता, ग्रामदेवता (उदा. महापुरुष, वेतोबा) अशा सर्व देवतांना त्यांच्या मानाचा भाग म्हणजे नैवेद्य दाखवला जातो.
- विशेष नैवेद्य: या दिवशी घरात पुरणाचे कडबू, भरड्याचे वडे, सांज्याचे घारगे, अळणी वडे, घावन-घाटले यांसारखे तळणीचे खास पदार्थ तयार केले जातात.
- प्रथा: तयार केलेला नैवेद्य दोन भागांत विभागला जातो—एक नैवेद्य घरात घेतला जातो आणि दुसरा बाहेर कामकरी लोकांना दिला जातो.
देवदिवाळीच्या निमित्ताने कुटुंबातील आणि गावातील पूर्वापार चालत आलेल्या सर्व देवतांचा आदरपूर्वक उल्लेख करून त्यांचा सत्कार केला जातो.