Income Tax Departmen | (Photo Credit -X)

आयकर विभागाने (Income Tax Department) नाशिक (Nashik) येथील कॅनडा कॉर्नर येथील सुराणा ज्वेलर्सवर (Surana Jewellers in Nashik) छापा टाकला. छाप्याच्या कारवाईत सुमारे सुमारे 26 कोटी रुपये रोख आणि 90 कोटी रुपयांच्या बेहिशेबी संपत्तीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. आयकर विभागाने शुक्रवारी (24 मे) केलेली ही कारवाई ज्वेलर्स मालकाच्या निवासस्थानापर्यंत आणि महालक्ष्मी बिल्डर्स या त्याच्या बांधकाम कंपनीपर्यंत विस्तारली. राका कॉलनी येथील आलिशान बंगल्यात स्वतंत्रपणे ही कारवाई पहाटेपासून सुरू झाली. आयटी अधिकाऱ्यांनी एकाच वेळी दागिन्यांचे दुकान आणि मालकाच्या घराला लक्ष्य केले. कारवाईसाठी आलेल्या पथकाकडून दिवसभर आर्थिक नोंदी, व्यवहाराचा डेटा आणि संबंधित कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली जात होती.

ज्वेलर्स आणि बिल्डर्सकडे कसून चौकशी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई अघोषित उत्पन्न आणि संभाव्य संशयास्पद आर्थिक घडामोडींच्या व्यापक तपासाचा एक भाग आहे. इकनम टॅक्स विभाग सुराणा ज्वेलर्स आणि महालक्ष्मी बिल्डर्स या दोन्हींच्या नोंदींची कसून चौकशी केली जात आहे, जेणेकरून कोणतीही तफावत किंवा छुपे व्यवहार ओळखता येतील. आयकर विभागाने छाप्याबद्दल कोणतेही अधिकृत निष्कर्ष किंवा विधाने आत्तापर्यंत जारी केलेली नाहीत. तथापि, विभागाने तपास पूर्ण केल्यावर महत्त्वपूर्ण माहिती पुढे येण्याची दाट शक्यता आहे. या कारवाईकडे संपूर्ण नाशिक शहराचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा, Income Tax Raids in Nanded: आयकर विभागाची नांदेडमध्ये धाड, 170 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त)

व्हिडिओ

सध्या सुरू असलेल्या छाप्यामुळे व्यापारी समुदायात खळबळ उडाली आहे. अनेकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूला बाजारपेठेचेही या कारवाईकडे बारीक लक्ष लागले आहे. प्राप्त माहितीनुसार, आयकर विभागास संपूर्ण कारवाई पूर्ण करण्यासाठी जवळपास 30 तास लागले. आयकर विभागाच्या नागपूर आणि जळगाव येथील अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. ही कारवाई पूर्ण होण्यासाठी 30 तासांहून अधिकचा कालावधी लागल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे जप्त केलेली रोख रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना जवळपास 14 तासांपेक्षाही अधिक वेळ काम करावे लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत सुमारे 50 ते 55 अधिकाऱ्यांचा समावेश होता.

एक्स पोस्ट

अलिकडी काही काळात ईडी, सीबीआय यांसारख्या केंद्रीय संस्था आणि आयकर विभागांसारख्या राज्य आणि केंद्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्था प्रचंड सक्रीय झाल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून अनेक व्यवसायिक, उद्योजक, राजकीय व्यक्ती आणि सेलिब्रेटी, खेळाडू मंडलींवरही कारवाई केली जात आहे. विविध प्रकरणांमध्ये सुरु असलेली चौकशी अधिक तीव्र केली जात आहे. तर काही प्रकरणांमध्ये नव्याने दखल घेतली जात आहे. त्यामुळे या संस्थांबाबत समाजात जोरदार चर्चा सुरु आहे.