New Driving License Rules 2024: येत्या 1 जूनपासून लागू होणार ड्रायव्हिंग लायसन्सचे नवीन नियम; आता टेस्ट देण्यासाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही
Driving | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

New Driving License Rules: आजकाल घराघरात बाईक किंवा कार दिसून येत आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कार-बाईक चालवणे सामान्य झाले आहे. प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार किंवा आवडीनुसार स्कूटर, बाईक, कार इत्यादीने प्रवास करतो. तुमच्याकडेही गाडी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. येत्या 1 जूनपासून नवीन वाहतूक नियम 2024 (New Driving License Rules 2024) लागू होत आहेत. तुम्ही या नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. अशा अडचणी टाळण्यासाठी, तुम्हाला वाहतूक आणि ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित नवीन नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.

सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) 1 जून 2024 पासून नवीन वाहन नियम जारी करणार आहे. नवीन नियमांनुसार 18 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील कोणी गाडी चालवत असेल तर त्यांना 25,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

कोणत्या लोकांना किती दंड होणार?

वेगमर्यादा ओलांडल्यास: 1000 ते 2000 रुपये दंड

अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवणे: 25,000 रुपयांपर्यंत दंड

परवान्याशिवाय वाहन चालवणे: 500 रुपये दंड

हेल्मेट न घातल्यास: 100 रुपये दंड

सीट बेल्ट न लावल्यास: 100 रुपये दंड

18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने वाहन चालवले तर त्या वाहनाचा परवाना रद्द होईल आणि तुम्हाला 25 वर्षांपर्यंत नवीन परवाना मिळणार नाही. याशिवाय इतर नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची तरतूद आहे.

आता नव्या नियमानुसार, तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी टेस्ट देण्यासाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही. यापुढे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टसाठी वेगळा पर्याय असेल. येत्या 1 जूनपासून तुम्ही सरकार मान्यताप्राप्त खासगी संस्थांमध्येही ड्रायव्हिंग लायसन्सची परीक्षा देऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला परवाना घ्यायचा असेल तर तुम्ही हा नवीन पर्याय निवडू शकता. यामुळे परवानाधारक ड्रायव्हर होण्याचा प्रवास थोडा सोपा होऊ शकतो.

नियमांनुसार वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच ड्रायव्हिंग लायसन्स बनवता येते. मात्र 50 सीसी क्षमतेच्या मोटारसायकलचा परवाना वयाच्या 16 व्या वर्षीही मिळू शकतो. मात्र, हा परवाना 18 वर्षांचा झाल्यानंतर अपडेट करावा लागेल. ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता प्राप्त झाल्यापासून 20 वर्षे आहे. तुम्हाला तुमचा परवाना 40 वर्षांनंतर 10 वर्षांनी आणि नंतर दर 5 वर्षांनी अपडेट करावा लागेल. व्यावसायिक परवाना मात्र दर तीन वर्षांनी नूतनीकरण करावा लागेल. तुमच्याकडे व्यावसायिक परवाना असल्यास किंवा तुमचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असल्यास, परवान्याचे नूतनीकरण करताना तुम्हाला डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल. (हेही वाचा: Mahindra XUV 3XO बुकींग सुरु होताच ग्राहकांचा तुफान प्रतिसाद, पहिल्याच तासात विकल्या गेल्या 50,000 गाड्या)

दरम्यान, परवाना मिळवण्यासाठी तुम्ही https://parivahan.gov.in/ वर ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता. अर्ज शुल्क परवान्याच्या प्रकारावर अवलंबून असते. तुम्हाला कागदपत्रे सबमिट करण्यासाठी आरटीओला भेट द्यावी लागेल आणि परवाना मंजूरीसाठी तुमचे ड्रायव्हिंग कौशल्य दाखवावे लागेल. सुमारे 900,000 जुनी सरकारी वाहने टप्प्याटप्प्याने काढून टाकून आणि कठोर कार उत्सर्जन नियम लागू करून प्रदूषण कमी करण्याचे नवीन नियमांचे उद्दिष्ट आहे.