Life Expectancy Dropped By 2 Years Due To Covid: कोरोना महामारीमुळे (Corona Virus) जगभरात लाखो लोकांचे मृत्यू झाले, तर अनेकांना गंभीर आजारांनी ग्रासले. आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शुक्रवारी सांगितले की, कोरोना महामारीमुळे जागतिक आयुर्मान (Life Expectancy) म्हणजेच जगण्याचा दर घसरला आहे. कोविड-19 मुळे आयुर्मानात स्थिर वाढ आणि जन्माच्या वेळी निरोगी आयुर्मानाचा कल आता पूर्णपणे एकमेकांच्या विरुद्ध झाला आहे. संघटनेने सांगितले की, कोरोनामुळे दशकभराची प्रगती संपुष्टात आली आहे. जागतिक सांख्यिकी अभ्यासानुसार, कोरोनामुळे जागतिक आयुर्मान 1.8 वर्षांनी घटून 71.4 वर्षांवर आल्याचे डब्ल्यूएचओने नोंदवले आहे, जे 2012 च्या पातळीवर पोहोचले आहे. म्हणजेच कोविडमुळे आयुर्मानाच्या बाबतीत मानवी समुदाय दशकभर मागे पडला आहे.
अभ्यासानुसार, 2021 मध्ये निरोगी व्यक्तीचे सरासरी वय 1.5 वर्षांनी कमी होऊन 61.9 वर्षे झाले आहे. आयुर्मानाचा हा दर 2012 मध्ये होता. याआधी लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात हीच बाब समोर आली होती. या अहवालानुसार, महामारीच्या काळात सरासरी आयुर्मान 1.6 वर्षांनी कमी झाले. अभ्यासाच्या संशोधकांनी सांगितले की, अर्ध्या शतकातील इतर कोणत्याही घटनेपेक्षा कोविड-19 चा आयुर्मानावर अधिक खोल प्रभाव पडला आहे.
कोविडमुळे जगभरातील आयुर्मानात एकसमान घट होत नसल्याचे डब्ल्यूएचओच्या अहवालातून समोर आले आहे. अभ्यासानुसार, अमेरिका आणि दक्षिण पूर्व आशिया हे कोविडमुळे सर्वाधिक प्रभावित क्षेत्र होते. या दोन्ही खंडांमध्ये आयुर्मान सुमारे 3 वर्षांनी घटले आहे. तर पश्चिम पॅसिफिक प्रदेशाला सर्वात कमी फटका बसला आहे. येथील आयुर्मान 0.1 वर्षांनी घटले आहे. युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, कोविड-19 साथीच्या आजारामुळे एकूण आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. या परिस्थितीमुळे आयुर्मानाची मोठी हानी झाली आहे.
दरम्यान, जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होऊन चार वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या काळात, कोरोनाच्या प्रकारांमध्ये अनेक वेळा उत्परिवर्तन झाले आणि संक्रमितांमध्ये सौम्य ते गंभीर लक्षणे आढळून आली. कोरोनाचा धोका अजूनही थांबलेला नाही. अलीकडील अहवालांनुसार, व्हायरसमध्ये पुन्हा एकदा उत्परिवर्तन झाले आहे, ज्यामुळे नवीन उप-प्रकार अनेक देशांमध्ये संसर्ग वाढताना दिसत आहे. सिंगापूरमधील स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथे फक्त दोन आठवड्यांत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये 90 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे.