Fish Oil Supplements and Heart Disease: सावध व्हा! ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स असलेले 'फिश ऑइल सप्लिमेंट्स' हृदयासाठी ठरू शकतात हानिकारक; अभ्यासात खुलासा
Fish Oil Supplements (Photo Credit : Pixabay)

Fish Oil Supplements and Heart Disease: सर्वसाधारणपणे, ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स (Omega-3 Fatty Acids) असलेले फिश ऑईल सप्लिमेंट्स (Fish Oil Supplements) हे हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचे मानले जातात, परंतु एका संशोधनात असे दिसून आले आहे की, याचे नियमितपणे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. या अभ्यासासाठी, चीन, ब्रिटन आणि यूएस मधील संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने, 40-69 वयोगटातील 415,737 सहभागींच्या (55 टक्के महिला) आरोग्याचे विश्लेषण केले, ज्यांनी नियमितपणे फिश ऑइल सप्लिमेंटचे सेवन केले होते.

यामध्ये 2006 आणि 2010 दरम्यान सहभागींचे सर्वेक्षण करण्यात आले आणि वैद्यकीय रेकॉर्ड डेटाच्या आधारे, मार्च 2021 अखेरपर्यंत मृत्यू डेटा देखील गोळा केला गेला. बीएमजे मेडिसीन या ओपन-एक्सेस जर्नलमध्ये प्रकाशित झालेले परिणाम दर्शवतात की, दररोज ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् समृध्द असे फिश ऑइल सप्लिमेंट्स घेतल्याने हृदयविकार आणि इतर रोग तसेच मृत्यूचा धोका वाढतो.

संशोधनात असेही म्हटले आहे की, ज्या लोकांना हृदयाची कोणतीही समस्या नाही त्यांनी जर या सप्लिमेंट्सचा नियमित वापर केला तर ॲट्रियल फायब्रिलेशन होण्याचा धोका 13 टक्के आणि स्ट्रोकचा धोका 5 टक्के जास्त असतो. यामध्ये दिसून आले की, अशी सप्लिमेंट्स घेतल्याने उत्तम आरोग्य असलेल्या महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका 6 टक्के आणि धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये 6 टक्के जास्त होता. (हेही वाचा: Warning Against BORG Trend: तरुणाईमध्ये वाढत आहे 'बोर्ग मद्य' पिण्याचा ट्रेंड; तज्ञांनी जारी केला इशारा, ठरू शकते जीवघेणे, जाणून घ्या सविस्तर)

पहा पोस्ट- 

याउलट, हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये, याच्या सेवनाने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 15 टक्के आणि हृदयाच्या विफलतेमुळे मृत्यूचा धोका 9 टक्क्यांनी कमी होतो. संशोधनात म्हटले आहे की हा एक निरीक्षणात्मक अभ्यास आहे, आणि कारणांबद्दल कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. यासाठी अधिक अभ्यास करण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे.