BORG Trend (संग्रहित संपादित प्रतिमा)

Warning Against BORG Trend: आजकाल कॉलेज विद्यार्थी म्हणजेच जेन-झी (Gen Z) मुलांमध्ये बोर्ग (BORG) मद्य पिण्याचा ट्रेंड वाढत असल्याचे दिसत आहे. सोशल मिडियावर असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये ही तरुण मुले बोर्ग नावाचे मद्य पिताना दिसत आहेत. मात्र आता तरुणाईच्या या धोकादायक प्रवृत्तीबद्दल आरोग्य तज्ञांनी इशारा दिला आहे. बोर्ग मद्य हे ‘ब्लॅकआउट रेज गॅलन’ (Blackout Rage Gallons) म्हणून ओळखले जाते. हे मद्य सामान्यत: दिवसाच्या पार्ट्यांमध्ये आढळते, ज्याला ‘डर्टी’ म्हणून ओळखले जाते. यामध्ये सहभागी लोक गॅलन-आकाराच्या प्लास्टिकच्या भांडयामधून हे मद्य पितात. नॅशनल कॅपिटल पॉइझन सेंटरने या मद्याबाबत इशारा जारी केला आहे.

वॉशिंग्टन, डीसी मधील नॅशनल कॅपिटल पॉयझन सेंटरनुसार ‘बोर्ग’ या शब्दाचा संदर्भ गॅलन-आकाराच्या प्लॅस्टिकच्या भांड्यात तयार केलेला पदार्थ असा आहे. यामध्ये सामान्यत: व्होडका किंवा इतर डिस्टिल्ड अल्कोहोल, पाणी, चव वाढवणारे पदार्थ, इलेक्ट्रोलाइट पावडर आणि इतर काही पेये असतात. मात्र यातील अल्कोहोलचे प्रमाण इतर घटकांपेक्षा खूप जास्त आहे, ज्यामुळे तज्ञ या मद्याला ‘जीवघेणे’ समजत आहेत.

बोर्ग हे अत्यंत जास्त प्रमाणात नशा मिळवण्याच्या उद्देशाने तयार केले आहे. मात्र अगदी एक बोर्गचे सेवन केल्याने अल्कोहोल विषबाधा होऊ शकते किंवा यातील अल्कोहोलचे प्रमाण जीवघेणे ठरू शकते. बोर्गमध्ये बहुतेक वेळा एक पंचमांश वोडका किंवा इतर हार्ड अल्कोहोल असतात, जे सुमारे 17 मानक पेयांच्या समतुल्य असते. यामुळे यातील अल्कोहोलचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. सध्या बोर्ग पिण्याचा ट्रेंडने केवळ महाविद्यालयीन पार्ट्यांमध्येच मर्यादित राहिला नसून, तो आता हायस्कूल पार्ट्यांमध्येही दिसून येत आहे.

पहा व्हिडिओ- 

या ट्रेंडमुळे मुलांच्या हॉस्पिटलायझेशनचे प्रमाण वाढले आहे. याआधी 2023 मध्ये मॅसॅच्युसेट्स ॲमहर्स्ट विद्यापीठातील असंख्य विद्यार्थ्यांना बोर्ग घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलांमध्ये अल्कोहोलच्या सेवनावर नियंत्रण नसल्याबद्दलही चिंता निर्माण होते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन अल्कोहोल ॲब्यूज अँड अल्कोहोलिझमच्या मते, दोन तासांच्या कालावधीत महिलेने चार मानक पेये आणि पुरुषांसाठी पाचपेक्षा जास्त पेये पिणे हे ‘बिंज ड्रिंकिंग’ (Binge Drinking) आहे. अशा परिस्थितीमध्ये अतिशय जास्त प्रमाणात अल्कोहोल असलेल्या बोर्गचे सेवन नक्कीच हानिकारक ठरू शकते.