Why Gudi Padwa is Celebrated: जाणून घ्या या सणामागचा इतिहास आणि पौराणिक कथा

गुढीपाडवा हा केवळ धार्मिक सण नसून तो निसर्गाशी आणि शेतीशी निगडीत आहे. या काळात वसंत ऋतूचे आगमन होते, झाडांना पालवी फुटते आणि रब्बी हंगामातील पिकांची कापणी पूर्ण झालेली असते.

Why Gudi Padwa is Celebrated: जाणून घ्या या सणामागचा इतिहास आणि पौराणिक कथा

मुंबई: महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण आणि हिंदू नववर्षाची दिमाखदार सुरुवात म्हणजे 'गुढीपाडवा'. यंदा १९ मार्च २०२६ रोजी हा सण साजरा होत आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी उभारली जाणारी गुढी केवळ विजयाचे प्रतीक नसून त्यामागे अनेक पौराणिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक कारणे दडली आहेत. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो, जो नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ असतो.

सृष्टीच्या निर्मितीचा दिवस

ब्रह्मपुराणानुसार, भगवान ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशीच या विश्वाची निर्मिती केली होती. याच दिवसापासून 'सत्ययुगा'ला सुरुवात झाली असे मानले जाते. त्यामुळे हा दिवस 'सृष्टीचा पहिला दिवस' किंवा 'सृष्टीचा वाढदिवस' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सृष्टीतील तेज तत्व आणि प्रजापती लहरी जास्त प्रमाणात कार्यरत असतात, असे आध्यात्मिक महत्त्व सांगितले जाते.

प्रभू श्रीरामांचे अयोध्येत पुनरागमन

रामायणातील कथेनुसार, प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा पराभव करून १४ वर्षांचा वनवास संपवला आणि याच दिवशी ते अयोध्येत परतले. प्रभू रामांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी अयोध्यावासीयांनी घरोघरी गुढ्या आणि तोरणे लावली होती. तेव्हापासून ही 'विजयाची गुढी' उभारण्याची परंपरा सुरू झाली.

राजा शालिवाहनाचे शौर्य

ऐतिहासिक संदर्भांनुसार, पैठणचे राजा शालिवाहन यांनी मातीचे सैन्य तयार करून आणि त्यांच्यात चैतन्य फुंकून बलाढ्य 'शकांचा' पराभव केला होता. या अभूतपूर्व विजयामुळे समाजात नवीन ऊर्जेचा संचार झाला. या विजयाची आठवण म्हणून 'शालिवाहन शक' ही नवीन कालगणना सुरू झाली आणि लोक घरावर गुढ्या उभारून आनंद साजरा करू लागले.

गुढीपाडवा हा केवळ धार्मिक सण नसून तो निसर्गाशी आणि शेतीशी निगडीत आहे. या काळात वसंत ऋतूचे आगमन होते, झाडांना पालवी फुटते आणि रब्बी हंगामातील पिकांची कापणी पूर्ण झालेली असते. शेतकरी आपल्या कष्टाचे फळ मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात.

(The above story first appeared on LatestLY on Mar 16, 2026 12:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).