
जगभरात कोरोनाच्या (-19) महामारीमुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती काही वर्षांपूर्वीच अनुभवली होती. त्यानंतर परिस्थिती हळूहळू सामान्य होत असताना, आता पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या लाटेने (COVID-19 2025 Surge) चिंता वाढवली आहे. हाँगकाँग, सिंगापूर, चीन आणि थायलंड यांसारख्या आशियाई देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना (COVID Symptoms दिसत आहे. या वाढीमागे ओमिक्रॉनच्या (Omicron Subvariant) नव्या JN.1 या सब-व्हेरिएंटसह त्याचे इतर प्रकार LF.7 आणि NB.1.8 हे कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्य तज्ज्ञांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला असून नागरिकांना स्वच्छता राखण्याचा सल्ला दिला आहे.
व्हेरिएंटचा प्रसार अधिक तीव्र?
नव्या JN.1 या सब-व्हेरिएंटसह इतर प्रकारांच्या व्हेरिएंटने संक्रमितांची संख्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस सुमारे 11,000 प्रकरणांपासून सुरुवात होऊन मे 2025 च्या सुरुवातीला रुग्णसंख्या 14,000 च्या पुढे गेली आहे. सध्या या व्हेरिएंटचा प्रसार अधिक तीव्र किंवा गंभीर आहे का, याबाबत ठोस पुरावे नसले तरी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. News18 च्या अहवालानुसार, सिंगापूरमध्ये सध्या नोंदवल्या जाणाऱ्या प्रकरणांपैकी दोन-तृतीयांश प्रकरणांमध्ये JN.1 चे LF.7 आणि NB.1.8 हे प्रकार आढळून येत आहेत.
प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर हवा
भारतदेखील यापासून फारसा दूर नाही. सध्या भारतात 93 सक्रिय COVID-19 प्रकरणे असल्याचे नमूद करण्यात आले आहे (19 मे 2025 नुसार). जरी सध्या आकडे कमी असले तरी, तज्ज्ञांच्या मते भारतातही लवकरच अशीच लाट दिसून येऊ शकते, विशेषतः लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यास. फोर्टिस शालीमार बाग येथील फुफ्फुसरोग विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ संचालक डॉ. विकास मौर्य यांनी ET HealthWorld शी बोलताना सांगितले, “हाँगकाँग आणि चीनमध्ये वाढती प्रकरणे ही घटती अँटीबॉडीज (प्रतिबंधक क्षमता) यामुळे होत असल्याचे दिसते. भारतातही असेच होऊ शकते. अनेकांनी खूप पूर्वी लस घेतली होती आणि आता त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो आहे.
JN.1 चा एक उप-प्रकार BA.2.86
दरम्यान, JN.1 चा एक उप-प्रकार BA.2.86 (जो Pirola नावानेही ओळखला जातो) ऑगस्ट 2023 मध्ये प्रथम आढळून आला होता. डिसेंबरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने त्याला “Variant of Interest” म्हणून घोषित केले. या प्रकारात सुमारे 30 म्युटेशन्स असून त्यामुळे तो आधीच्या प्रकारांच्या तुलनेत अधिक प्रभावीपणे रोगप्रतिकारक शक्तीला चकवा देतो. BA.2.86 जरी फारसा प्रबळ झाला नसला तरी, त्यापासून विकसित झालेला JN.1 अधिक वेगाने पसरण्याची क्षमता बाळगतो, असे Johns Hopkins University ने नमूद केले आहे.
Yale Medicine च्या माहितीनुसार, JN.1 मध्ये त्याच्या मूळ प्रकाराच्या तुलनेत स्पाइक प्रोटीनमध्ये एक अतिरिक्त म्युटेशन आहे. त्यामुळे हा प्रकार रोगप्रतिकारक शक्तीपासून अधिक सहजपणे बचाव करू शकतो, असे संशोधकांचे मत आहे. मात्र, याबाबत आणखी संशोधनाची आवश्यकता आहे.
JN.1 चे लक्षणे पूर्वीप्रमाणेच आहेत — घसा खवखवणे, ताप, खोकला, नाक वाहणे किंवा बंद होणे, थकवा, अंगदुखी आणि काही वेळा वास किंवा चव जाणे. सौम्य संसर्गाची लक्षणे घरीच नियंत्रणात ठेवता येतात, मात्र ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, त्यांनी अधिक काळजी घ्यावी.
आरोग्य विभाग आणि तज्ज्ञांनी नागरिकांना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. वेळेवर उपचार घेणे, स्वच्छता पाळणे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे, हे महत्त्वाचे आहे.