IND vs SA (Photo Credit - X)

IND vs SA: भारतीय क्रिकेट संघाला आपल्याच घरच्या मैदानावर पुन्हा एकदा लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे क्रिकेटप्रेमीमध्ये प्रंचड राग निर्माण झाल आहे. गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाला तब्बल ४०८ धावांनी लोळवले. न्यूझीलंडपाठोपाठ आता दक्षिण आफ्रिकेनेही भारतीय संघाला त्यांच्याच घरात २-० ने पराभूत करत मालिकेत क्लीन स्वीप दिला आहे. (हे देखील वाचा: T20 World Cup 2026 च्या वेळापत्रकाची घोषणा; टीम इंडिया 'या' देशांशी भिडणार, पाहा भारताचा संपूर्ण कार्यक्रम!)

कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव

भारतीय संघाला त्यांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील धावांच्या फरकाने सर्वात मोठ्या आणि सर्वात लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. ५४९ धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ दुसऱ्या डावात केवळ १४० धावांत गारद झाला. यापूर्वी, २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला ३४२ धावांनी हरवले होते आणि २००६ मध्ये पाकिस्तानने ३४१ धावांनी पराभूत केले होते. तो विक्रम मोडून ही सर्वात मोठी हार ठरली आहे.

पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली फलंदाजी

पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाज पाहुण्या संघाच्या फिरकीपटूंसमोर निष्प्रभ ठरले. फलंदाजी फळी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, ज्यामुळे टीम इंडियाला मोठा फटका बसला.

२० वर्षांतील लाजिरवाणा विक्रम

गेल्या २० वर्षांत प्रथमच असे घडले आहे की, भारतीय संघाच्या एकाही फलंदाजाला संपूर्ण कसोटी मालिकेत शतक करता आले नाही. यापूर्वी १९९५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत ही निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली होती. भारतीय फलंदाज मालिकेमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरले, त्याची मोठी किंमत टीम इंडियाला मोजावी लागली.

दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय

धावांच्या फरकाने कसोटी क्रिकेटमधील दक्षिण आफ्रिकेचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी २०१८ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला ४९२ धावांनी हरवले होते. महत्वाचे म्हणजे, दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे. यापूर्वी त्यांनी २००० साली भारतात कसोटी मालिका जिंकली होती.