Rajkot Gaming Zone Fire

Rajkot Gaming Zone Fire: गुजरातमधील (Gujarat) राजकोटमधून (Rajkot) एक धक्कादायक बाब समोर येत आहे. या ठिकाणी नाना मावा रोडवर असलेल्या टीआरपी मॉलच्या गेम झोनमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीत 20 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आगीच्या घटनेमुळे संपूर्ण गेम झोन जाळून खाक झाला आहे. दुपारी 4.15 च्या सुमारास नियंत्रण कक्षाला गेम झोनमध्ये आग लागल्याचा फोन आला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, बचावकार्यासह आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतमध्ये लहान मुलांसह अनेक जण अडकले असण्याची शक्यता आहे. आग कशी लागली याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

पोलीस आयुक्त राजू भार्गव म्हणाले, गेमिंग झोनमध्ये अजूनही काही लोक अडकले असावेत. आग आटोक्यात आणल्यानंतर टीम आत जाणार आहे. त्यानंतरच काहीतरी स्पष्ट होईल. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. मात्र वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने त्यात अडचणी येत आहेत.

पहा व्हिडिओ- 

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सोशल मीडिया अकाउंट X वर या प्रकरणाबाबत पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘राजकोटमधील गेम झोनमध्ये आगीच्या घटनेबाबत महापालिका आणि प्रशासनाला तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या व्यवस्थेला प्राधान्य देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.’ (हेही वाचा: Char Dham Yatra 2024 Death Toll: उत्तराखंडमधील चारधाम यात्रेत आतापर्यंत 50 हून अधिक भाविकांचा मृत्यू; केदारनाथमध्ये सर्वाधिक 27 लोकांनी गमावला आपला जीव)

या घटनेनंतर पोलिसांनी गेम झोनच्या मालकाला अटक केली असून, राजकोटमधील सर्व गेम झोन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व गेम झोनची तपासणी करण्यात येणार आहे. राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव म्हणाले, ‘गेमिंग झोन युवराज सिंग सोलंकी नावाच्या व्यक्तीच्या मालकीचा आहे. निष्काळजीपणा आणि मृत्यू याबद्दल सोलंकीविरुद्ध गुन्हा नोंदवला जाणार आहे. इथले बचाव कार्य पूर्ण केल्यानंतर पुढील तपास केला जाईल.’