Char Dham Yatra 2024 Death Toll: उत्तराखंडमधील चारधाम यात्रेत आतापर्यंत 50 हून अधिक भाविकांचा मृत्यू; केदारनाथमध्ये सर्वाधिक 27 लोकांनी गमावला आपला जीव
Uttarakhand Chardham Yatra 2024

Char Dham Yatra 2024 Death Toll: उत्तराखंड चारधामला (Uttarakhand Chardham Yatra) भेट देणाऱ्या भाविकांच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार, गेल्या 16 दिवसांत मृतांचा आकडा 56 वर पोहोचला आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत झालेल्या सर्व भाविकांचे मृत्यू हे चारधाम यात्रा मार्गावरच झाले आहेत. गेल्या 24 तासांबद्दल बोलायचे झाले तर केदारनाथमध्ये चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. आता सरकारी कर्मचारी चारधाम यात्रा मार्गावरील व्यवस्था सुधारण्यात व्यस्त आहेत.

यावेळी चारधाम यात्रा हे सरकारसाठी मोठे आव्हान बनले आहे. एकीकडे सरकार चारधाममधील गर्दी नियंत्रित करण्यात व्यस्त आहे, तर दुसरीकडे भाविकांच्या मृत्यूची संख्याही झपाट्याने वाढत आहे. 10 मेपासून सुरू झालेल्या चारधाम यात्रेत आतापर्यंत 56 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, 25 मे रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत, 56 भाविकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी सर्वाधिक केदारनाथ धाममध्ये 27, बद्रीनाथ धाममध्ये 14, यमुनोत्री धाममध्ये 12 आणि गंगोत्री धाममध्ये 3 भाविकांचा मृत्यू झाला आहे. याआधी 2023 मध्ये चारधाम यात्रेदरम्यान सुमारे 250 भाविकांचा मृत्यू झाला होता. उत्तराखंडचे आरोग्य महासंचालक डॉ. विनीता शाह यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 25 टक्के अधिक वैद्यकीय कर्मचारी चारधाम यात्रेत तैनात करण्यात आले आहेत. (हेही वाचा: IMD Weather Forecast: भारताच्या दक्षिणेला Heavy Rainfall, उत्तरेला उष्णतेची लाट; आयएमडीने वर्तवला हवामान अंदाज; घ्या जाणून)

यावेळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यानंतरच त्यांना फिल्डवर पाठवण्यात आले आहे. चारधाम यात्रेसाठी पुरेसा वैद्यकीय कर्मचारी असल्याचा दावा आरोग्य महासंचालक शहा यांनी केला आहे. चारधाम यात्रेदरम्यान कोणत्याही ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाल्यास त्या ठिकाणीही डॉक्टर्स तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आरोग्य विभाग भाविकांच्या मृत्यूशी संबंधित संपूर्ण डेटाचे विश्लेषण करेल. जेणेकरून आगामी काळात योग्य नियोजन करता येईल.

शहा म्हणाले की, विविध ठिकाणी भाविकांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर काही भाविकांना रक्तदाब सारखी समस्या उद्भवल्यास औषधे देऊन ती नियंत्रित केली जात आहे. भाविकांनी आरामात प्रवास करण्याचे आवाहन आरोग्य महासंचालक शहा यांनी केले आहे. भक्ताची ऑक्सिजन पातळी कमी असल्यास रुग्णाला जवळच्या सुविधा केंद्रात दाखल केले जात आहे. याशिवाय भाविक 104 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून मदत मागू शकतात. गढवालचे आयुक्त विनय शंकर म्हणाले की, चारधाम यात्रेच्या मार्गावर मृत्युमुखी पडलेल्या सर्व भाविकांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेकांचे वय 60 वर्षांहून अधिक आहे. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे समोर आले आहे.