Leopard Hunted a Dog | | (Photo Credits: ANI)

Leopard Hunted a Dog Viral Video: मानवी लोकवस्तीत बिबट्यांचा (Leopard) वावर वाढल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो. पण आता केवळ मानवी वस्तीतच नव्हे तर लोकांच्या घरात आणि दारातही बिबट्याचे पाऊल पडताना दिसत आहे. पुणे येते अशीच एक घटना घडली. पुणे जिल्ह्यातील हिंजवडी (Hinjewadi) जवळ असलेल्या नेरे (Nere) गावात शिंदे वस्तीमध्ये (Shinde Vasti राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या दारात बिबट्या आला. त्याने या शेतकऱ्याच्या दारात झोपलेल्या त्याच्या पाळीव कुत्र्याची शिकार केली. घटना सीसीटीव्हीमध्ये (Leopard Hunted a Dog CCTV Visuals) कैद झाली आहे. तसेच हे सीसीटीव्ही फुटेज व्हीडीओ रुपात सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक घराच्या दरवाजात एक पाळीव कुत्रा झोपला आहे. घराचा दरवाजा बंद आहे. कुत्राही गाढ झोपला आहे. इतक्यात बिबट्या प्रवेश करताना दिसतो. दबा धरुन बसलेला बिबट्या अगदी हळूवारपणे, ज्याला आपण चोरपावलेही म्हणून शकतो. इतक्या सावधपणे पावले टाकत कुत्र्याच्या जवळ येतो. खरे तर कुत्रा हा तसा चाहूलबाज प्राणी. पण एरवी चाहूलबाज असलेला कुत्रा या घटनेत मात्र अगदीच निपचीत पडलेला दिसतो आहे. बिबट्या जवळ येऊन हुंगत असल्याचेही कुत्र्याच्या लक्षात येत नाही. शेवटी कुत्रा थोडीफार हालचाल करतो इतक्यातच बिबट्या त्याच्यावर झडप घालतो. कुत्रा, काहीसा प्रतिकार करायचा आणि भुकण्याचा प्रयत्न करतो. पण, तोवर खूपच उशीर झालेला असतो. बिबट्याची पकड कुत्र्याचा गळा आवळत जाते. कुत्रा प्रतिकार सोडून निपचीत पडतो.

व्हिडिओ

दरम्यान, घराच्या दरवाजात काहीतरी हालचाल सुरु असल्याचे घरातील लोकांना कळते. ते तातडीने दरवाजा उघडून बाहेर पाहतात. पण त्यांना कुत्रा दिसत नाही. नंतर काही लोक घराबाहेरही पडताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. परंतू, बिबट्याने कुत्र्याची केव्हाच शिकार केलेली असते.

ट्विट

दरम्यान, कान्हे येथील महिंद्रा स्पेअर्स कंपनी जवळच्या रस्त्यावरुन बिबट्या पुढे पळत असल्याचेही दुसऱ्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. दरम्यान, या घटनेनंतर पुन्हा एकदा परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.