eMotorad Electric Cycle Gigafactory: इलेक्ट्रिक सायकल उत्पादक कंपनी ईमोटोरॅड (eMotorad) भारतातील सर्वात मोठी गिगाफॅक्टरी उभारत आहे. पुण्याजवळील रावेत येथे हा कारखाना उभा केला जात असून त्याचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने गेल्या महिन्यात इमोटोराड या इलेक्ट्रिक सायकल उत्पादक कंपनीत गुंतवणूक केली होती. मात्र, त्याने या ई-सायकल कंपनीत किती गुंतवणूक केली हे अद्याप कळू शकलेले नाही. महेंद्रसिंग धोनी किंवा कंपनीने गुंतवणुकीच्या रकमेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
राजीव गंगोपाध्याय, कुणाल गुप्ता, आदित्य ओझा आणि सुमेध बट्टेवार यांनी 2020 मध्ये ईमोटोरॅडची स्थापना केली होती, ज्याचा उद्देश साहसी लोक तसेच दैनंदिन प्रवासी इत्यादींना परवडणाऱ्या किमतीत इको-फ्रेंडली, भविष्यकालीन ई-बाईक प्रदान करणे हा आहे.
रावेत येथे असलेला ईमोटोरॅडचा उत्पादन कारखाना 2 लाख 40 हजार चौरस फुटांमध्ये पसरलेला असेल. 15 ऑगस्टपासून या प्लांटचे कामकाज अधिकृतपणे सुरू होणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ऑपरेशन सुरू झाल्यानंतर या प्लांटमध्ये 5 लाख इलेक्ट्रिक सायकली तयार करण्याची क्षमता असेल. प्लांट चालवण्यासाठी कंपनी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करणार आहे. सध्या कंपनीत 250 कर्मचारी आहेत. कंपनी 300 नवीन कर्मचारी नियुक्त करण्याच्या योजनेवर काम करत आहे.
ईमोटोरॅडचे म्हणणे आहे की, पुण्याजवळ बांधला जाणारा त्याचा उत्पादन प्रकल्प चार टप्प्यात तयार होईल. प्लांटची प्रचंड मोठी क्षमता लक्षात घेऊन त्याला गिगाफॅक्टरी असे संबोधले जात आहे. कंपनीचा दावा आहे की, सर्व चार टप्पे पूर्ण झाल्यानंतर, रावेत येथील गिगाफॅक्टरी ही संपूर्ण दक्षिण आशियासह जगातील सर्वात मोठी एकात्मिक ई-सायकल सुविधा असेल.
कंपनी स्वतः या प्लांटमध्ये ई-सायकलमध्ये वापरले जाणारे अनेक सुटे भाग तयार करणार आहे. कंपनीने प्लांटमध्ये स्वतःच बॅटरी, मोटर्स, डिस्प्ले आणि चार्जर तयार करण्याची योजना आखली आहे. कंपनीने आपल्या उत्पादनांची श्रेणी वाढवण्याचीही योजना आखली आहे. आगामी काळात, ईमोटोरॅड नवीन इलेक्ट्रिक सायकलीसह नवीन नाविन्यपूर्ण उत्पादने लॉन्च करू शकते. (हेही वाचा: Mahindra XUV 3XO Launch in India: महिंद्रा XUV 3XO भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खास फिचर्स)
दरम्यान, ईमोटोरॅडने पँथेरा ग्रोथ पार्टनर्सच्या नेतृत्वाखाली सीरीज बी फेरीत $20 दशलक्ष फंडिंग जमा केले आहेत. या फेरीत xto10x, Alteria Capital आणि Green Frontier Capital यांचा सहभाग आहे. स्मार्ट इलेक्ट्रिक सायकली विकसित करण्यासाठी, उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि देशांतर्गत व जागतिक बाजारपेठांमध्ये आपली ऑफलाइन उपस्थिती वाढवण्यासाठी या निधी वापरण्याची स्टार्टअपची योजना आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांनी वर्षांत $36 दशलक्ष पेक्षा जास्त महसूल परतावा मिळवला आहे आणि 80,000 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक सायकली विकल्या आहेत.