Paytm Layoffs: पेटीएमची (Paytm) मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशन्स (One97 Communications) आपला खर्च कमी करण्यासाठी या आर्थिक वर्षात अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कमी करू शकते. एका मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी 15 ते 20 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढू शकते. याचा अर्थ वर्कफोर्समधून 5,000 ते 6,300 कर्मचाऱ्यांची कपात होऊ शकते. कंपनीने याद्वारे 400 ते 500 कोटी रुपयांची बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
आर्थिक वर्षे 2023 मध्ये, वन97 कम्युनिकेशन्स कंपनीत वेतनावर सरासरी 32,798 कर्मचारी होते. यातील 29,503 कर्मचारी सक्रियपणे कार्यरत आहेत. आर्थिक वर्षे 2024 साठी, एकूण कर्मचारी खर्च वार्षिक 34 टक्क्यांनी वाढून 3,124 कोटी रुपये झाला आहे.
बातमीनुसार, कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची प्रक्रिया आधीच सुरू आहे. डिसेंबरमध्ये, कंपनीने वेगवेगळ्या विभागातील 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले. आर्थिक वर्ष 2024 मधील कर्मचाऱ्यांची संख्या जाहीर केलेली नाही. तंत्रज्ञान, व्यापारी विक्री आणि वित्तीय सेवांमधील गुंतवणुकीमुळे अलीकडच्या काळात आमच्या कर्मचाऱ्यांच्या खर्चात वाढ झाली आहे, असे कंपनीने आपल्या गुंतवणूकदार सादरीकरणात म्हटले आहे. (हेही वाचा: IIT Job Crisis: आयआयटीमध्ये नोकरीचे संकट? 2024 बॅचचे 38% विद्यार्थी अजूनही प्लेसमेंटच्या प्रतीक्षेत)
महसुलात घट झाल्यामुळे वन97 कम्युनिकेशन्सचा निव्वळ तोटा जानेवारी-मार्च तिमाहीत 550 कोटी रुपये झाला आहे, जो एका वर्षापूर्वी 168 कोटी रुपये होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घातल्यानंतर मार्च तिमाहीत कंपनीचा परिचालन महसूल वार्षिक 3 टक्क्यांनी घसरून 2,267 कोटी रुपयांवर आला. पेमेंट बँकांवरील आरबीआयच्या निर्बंधांमुळे कंपनीच्या चौथ्या तिमाहीमधील निकालांवर गंभीर परिणाम झाला. कंपनी आता स्वतःला तयार करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.