Cyber Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबईत (Mumbai) सोशल मीडियावरील सायबर गुन्ह्यांमध्ये (Cybercrime) वाढ झाली असून, दोन धक्कादायक घटनांनी पोलीस आणि नागरिकांचे लक्ष वेधले आहे. कांजूरमार्ग येथे एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीला बनावट स्नॅपचॅट प्रोफाइलद्वारे अश्लील छायाचित्रांसह ब्लॅकमेल करण्यात आले, तर भांडुप येथील एका कॉलेज विद्यार्थ्याने प्रौढांसाठी सामग्री ऑफर घोटाळ्यात 2.74 लाख रुपये गमावले. या दोन्ही घटनांमध्ये सायबर गुन्हेगारांनी सोशल मीडियाचा गैरवापर करून तरुणांना लक्ष्य केले आहे.

कांजूरमार्ग येथील एका 11 वर्षीय मुलीला स्नॅपचॅटवर बनावट प्रोफाइलद्वारे ब्लॅकमेल करण्यात आले. गुन्हेगाराने ‘सानवी राव’ नावाने प्रोफाईल सुरु करून, तरुणीशी संवाद साधला आणि तिची वैयक्तिक माहिती मिळवली. त्यानंतर, तिला अनुचित फोटो पाठवण्यास भाग पाडले, जे नंतर तिला अधिक खाजगी फोटो पाठवण्यासाठी ब्लॅकमेल करण्यासाठी वापरले गेले. शेवटी, पीडितेने तिच्या पालकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर सेलने बनावट प्रोफाइलचा माग काढण्यासाठी तपास सुरू केला असून, स्नॅपचॅटच्या सर्व्हरमधून डेटा मिळवण्यासाठी कंपनीशी संपर्क साधला आहे. पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की, हा गुन्हा सायबर गुन्हेगारी टोळीने केला असावा. (हेही वाचा: India-Pakistan Conflict: भारत-पाक संघर्षाबद्दल चुकीची माहिती देणाऱ्या 5,000 सोशल मीडिया पोस्ट हटवल्या; Maharashtra Cyber ची कारवाई)

दुसऱ्या प्रकरणात, भांडुपमधील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला इंस्टाग्रामवर एक लिंक मिळाली ज्यामध्ये 2000 रुपयांमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ कॉलची ऑफर देण्यात आली होती. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मुलाला एक व्हॉट्सअॅप नंबर मिळाला. तिथे सुरुवातीला त्याला सेवा शुल्क भरण्यास सांगण्यात आले. त्याने छोट्या हप्त्यांमध्ये 4,999 रुपये भरल्यानंतर, विद्यार्थ्याला पोलीस अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीकडून धमकीचा फोन आला. त्याने स्वतःची ओळख ‘रवींद्र सिंह’ अशी करून.

आपण उत्तर प्रदेश पोलीस असल्याचे सांगून फोन करणाऱ्याने विद्यार्थ्यावर एका मुलीला ऑनलाइन त्रास देण्याचा आरोप केला आणि कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी आणखी पैसे मागितले. घाबरलेल्या विद्यार्थ्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येण्यापूर्वीच, 2.74 लाख रुपये ट्रान्सफर केले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही प्रकरणे एका चिंताजनक ट्रेंडकडे निर्देश करतात, जिथे सायबर गुन्हेगार बनावट ओळख, बनावट सामग्री आणि धमकी देण्याच्या युक्त्यांचा वापर करून असुरक्षित वापरकर्त्यांना अडकवण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. भांडुप पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये, संबंधित पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.