पंतप्रधान मोदी यांना तुरुंगात टाकू: काँग्रेस नेते वसंत पुरके यांचे वदग्रस्त विधान
(archived, edited, symbolic images)

विरोधकांनी भाजप सरकार विरोधात सुरु केलेल्या जनसंघर्ष यात्रेत (Jan Sangharsh Yatra)आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी उल्लेख करत टीका करण्यात आली. जनसंघर्ष यात्रेत काँग्रेस नेते वसंत पुरके (Congress Leader Vasant Purke) यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मात्र, या वेळी पुरके यांनी शब्दांची सीमा पार केली त्यांच्या भाषणात शब्दांचा दर्जा घसरल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस ही काही मोदींच्या बापाची मालमत्ता नाही. सत्ताबदल होत असतो. काँग्रेसची सत्ता येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य केले. पुरके यांच्या या विधानावरुन जोरदार वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसची सरकार विरोधातील जनसंघर्ष यात्रा सुरु आहे. सध्या ही यात्रा पूर्व विदर्भात सुरु असून, या यात्राचा हा पाचवा टप्पा आहे. या यात्रेत बोलतानाच पुरके यांनी ही वक्तव्ये केली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतानाही पुरके यांनी त्यांचा एकेरी उल्लेख केला. ते म्हणाले, 'अनेक महिलांचे आयुष्य बरबाद करणारा बाबा राम रहीम हा फडणवीस यांना अष्टपैलू असणारा व्यक्ती वाटतो. माझा तर मुख्यमंत्री फडणवीसांना सल्ला आहे की, त्यांनी बाबा राम रहीयम यास स्वत:च्या घरी घेऊन जावे. हा बाबा त्यांना एखादा पैलू तरी दाखवल्याशिवय राहणार नाही.' (हेही वाचा, Year Ender 2018 : वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेले देशभरातील टॉप 10 राजकीय नेते)

दरम्यन, भाजपकडून काँग्रेस आणि काँग्रेस नेतृत्वावर अनेकदा तीव्र शब्दांत हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे आता काँग्रेस नेते वसंत पुरके यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करत काँग्रेस विरोधकांच्या हाती आयते कोलीतच दिले आहे. या पार्श्वभूमिवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते याबाबत उत्सुकता आहे.