Doctor प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

Family Infected With Brain Worms: अमेरिकेत (US) अस्वलाचे कच्चे, पूर्णतः न शिजलेले मांस (Undercooked Bear Meat) खाणे एका कुटुंबाला अतिशय महागात पडले आहे. हे मांस खाल्यानंतर कुटुंबातील सहा जण आजारी पडले. या लोकांच्या मेंदूमध्ये जंत किंवा अळ्या (Brain Worms) झाल्याची माहिती आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या अहवालात ही बाब समोर आली आहे. रिपोर्टनुसार, ही घटना जुलै 2022 मध्ये घडली होती. प्रथम, मिनेसोटामधील 29 वर्षीय पुरुषाला ताप, स्नायू दुखणे आणि सुजलेल्या डोळ्यांसारख्या लक्षणांमुळे अनेक वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याचे कुटुंबीयही आजारी पडत गेले. या सर्वांनी एका कार्यक्रमात अस्वलाच्या मांसापासून बनवलेले कबाब खाल्ले होते.

अहवालानुसार, हे मांस आहे त्या स्थितीमध्ये जवळजवळ दिड महिने डीप फ्रीजरमध्ये ठेवले होते. त्यानंतर त्याचे कबाब बनवले गेले. अशा प्रकारे हे मांस अर्धवट शिजलेले होते. हे कबाब 29 वर्षीय तरुणासह सहा जणांनी खाल्ले. खाल्ल्यानंतर ते कच्चे असल्याचे लक्षात आल्यावर ते पुन्हा शिजवले गेले, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. हळूहळू या सहा जणांची प्रकृती ढासळत गेली.

डॉक्टरांनी तपासणी केली असता या पुरुषामध्ये ट्रायचिनेलोसिस नावाचा राउंडवर्मचा गंभीर प्रकार आढळला. हा आजार विशेषतः वन्य प्राण्यांच्या खाण्याने होतो. त्याचा जंत शरीरातून जातो आणि मेंदूपर्यंत पोहोचतो. त्यानंतर 12 वर्षांच्या मुलीसह कुटुंबातील इतरही सदस्यांमध्ये फ्रीझ-प्रतिरोधक वर्म्स दिसून आले. या सर्वांवर अल्बेंडाझोल नावाच्या औषधाने उपचार केले जात आहेत, जे शरीरात कृमींचे पुनरुत्पादन रोखते. (हेही वाचा: चीनी व्यक्ती च्या मेंदुत 17 वर्षांपासुन राहत होती 5 इंच लांंब अळी, डॉक्टर म्हणतात कच्चे बेडुक व साप खाल्ल्याने झाला परिणाम)

सीडीसीनुसार, कच्च्या मांसामधील हे वर्म्स मारण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे किमान 165 डिग्री फॅरेनहाइट पर्यंत मांस योग्य प्रकारे शिजवणे. सीबीएस न्यूजच्या डॉ. सेलीन गौंडर यांना ब्रेन वर्मच्या लक्षणांबद्दल विचारले असता, त्या म्हणाल्या की उलट्या, डोकेदुखी आणि फेफरे ही त्याची मुख्य लक्षणे आहेत. मात्र, काही लोकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत.