Rohit Sharma (Photo Credit - X)

Rohit Sharma Retirement: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सिडनी येथे पाचवा कसोटी सामना खेळला जात आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) या मॅचमध्ये न खेळल्याची बरीच चर्चा झाली होती आणि आता त्यानेच या मॅचमध्ये न खेळण्याचं कारण सांगितलं आहे. दुस-या दिवशी पहिले सत्र संपले तेव्हा ब्रेक दरम्यान रोहितची एक मुलाखत टीव्हीवर दिसली ज्यामध्ये त्याने निवृत्तीपासून ते सिडनी कसोटी न खेळण्यापर्यंतच्या अनेक प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरे दिली. रोहितने सध्या केवळ या कसोटीतून माघार घेतल्याचे स्पष्ट केले असून भविष्यात तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.

मी स्वतः माघार घेतली आहे- रोहित शर्मा

दुस-या दिवशी लंच ब्रेक दरम्यान, स्टार स्पोर्ट्सवर इरफान पठाण आणि जतीन सप्रू यांना दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्माला जेव्हा विचारण्यात आले की त्याला संघातून वगळण्यात आले आहे, विश्रांती घेतली आहे की त्याने स्वतःच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे? याला उत्तर देताना भारतीय कर्णधार म्हणाला, "काही नाही (हसत). मी स्वतः माघार घेतली आहे. मी निवडकर्त्यांना आणि प्रशिक्षकांना सांगितले की माझ्या बॅटमधून धावा होत नाहीत, त्यामुळे मी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे." या मालिकेत आतापर्यंत रोहितने 5 डावात केवळ 31 धावा केल्या होत्या.

हे देखील वाचा: IND vs AUS: रोहित शर्मानंतर कोहलीला टीम इंडियातून डच्चू? इंग्लंड मालिकेपूर्वी मोठा निर्णय होण्याची शक्यता

बाहेर बसलेल्या लोकांनी ठरवू नये की, मी कधी निवृत्ती घ्यावी

तो म्हणाला, "सध्या धावा काढल्या जात नाहीत, पण 5 महिन्यांनंतर किंवा दोन महिन्यांनंतरही धावा होणार नाहीत याची शाश्वती नाही. मी खूप मेहनत करेन. “बाहेर लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेल्या लोकांनी ठरवू नये की, मी कधी निवृत्ती घ्यावी. तो माझा निर्णय आहे आणि मी एवढ्यात हा निर्णय घेणार नाही. मी मेहनत घेईन माझ्या कमकुवतपणा वर काम करेन आणि कमबॅक करेन”. दरम्यान अश्या परिस्थितीत रोहित शर्माने एक गोष्ट मात्र स्पष्ट केलं आहे की, तो इतक्यात कसोटीतून निवृत्तीचा निर्णय घेणार नाहीये.