नवदुर्गा कोल्हापूर (Photo credit : Lokprabha)

Navratri 2025: आजपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्रीचे हे नऊ दिवस देवीच्या आराधनेसाठी अत्यंत पवित्र मानले जातात. अनादी काळापासून ही परंपरा सुरू असून, देवीने नऊ दिवस चाललेल्या भीषण युद्धात अनेक दैत्यांचा संहार करून महिषासुराचा वध केला, म्हणूनच तिला ‘महिषासुरमर्दिनी’ म्हणून ओळखले जाते. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. संपूर्ण भारतात देवीची अनेक शक्तीस्थळे आहेत, ज्यात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा समावेश होतो. अंबाबाईसोबतच कोल्हापूरमध्ये देवीची नऊ जागृत देवस्थाने आहेत, ज्यांना एकत्रितपणे ‘नवदुर्गा’ असे म्हटले जाते.

धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कोल्हापूरमधील या नवदुर्गा अत्यंत प्राचीन आहेत. पूर्वी शहराला असणाऱ्या तटबंदीच्या बाहेर या देवींची मंदिरे होती, पण आता शहराच्या वाढीमुळे ती शहराच्या मध्यवर्ती भागातच पाहायला मिळतात. या नवदुर्गांचे दर्शन घेतल्याने आपोआपच कोल्हापूर शहराची प्रदक्षिणाही पूर्ण होते.

Navratri Ghatasthapana 2025 HD Images: नवरात्र उत्सवानिमित्त WhatsApp Messages, Greetings द्वारे घटस्थापनेच्या द्या खास शुभेच्छा!

करवीरनगरीतील नऊ दुर्गा आणि त्यांचा महिमा

१. एकांबिका (एकविरा देवी)

नवदुर्गांच्या मालिकेतील ही पहिली देवी आहे. आझाद चौकातील कॉमर्स कॉलेजजवळ तिचे छोटे मंदिर आहे. एकविरा, रेणुका, यल्लमा यांसारख्या इतर नावांनीही ही शक्तीप्रधान देवता ओळखली जाते.

२. मुक्तांबिका (मुकांबा देवी)

नवदुर्गांमधील ही दुसरी देवी आहे. ज्ञानमय आणि मुक्तस्वरूप असे तिचे वर्णन केले जाते. ही देवी आद्य शंकराचार्यांची उपासना देवता असून, मंगळवार पेठेतील विवेकानंद आश्रमाजवळ तिचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये काही काळ स्वामी विवेकानंद वास्तव्यास होते.

३. पद्मांबिका (पद्मावती देवी)

नवदुर्गांपैकी तिसरी देवता म्हणून पद्मावती देवीला ओळखले जाते. नरसिंह स्वरूप असणारी ही देवी पापनाश करणारी मानली जाते. जयप्रभा स्टुडिओजवळ या देवीचे मंदिर आहे, जिथे एक पद्मावती तलावदेखील आहे.

४. प्रियांगी देवी (फिरंगाई)

फिरंगाई ही नवदुर्गा मालिकेतील चौथी आणि कोल्हापूरच्या पूर्वीच्या पाच गावांपैकी एका गावाची ग्रामदेवता आहे. ही पीडा दूर करणारी देवता मानली जाते. पद्माराजे शाळेजवळ या देवीचे मंदिर असून, मंदिरातील तळ्यातील पाणी त्वचारोगांवर उपचार म्हणून वापरले जायचे असे मानले जाते.

५. कमलजा (कमलांबिका देवी)

नवदुर्गांमधील पाचवी देवता कमलजा ऊर्फ कमलांबा आहे. रंकाळा तलावाच्या दिशेने जाताना अर्धा शिवाजी पुतळ्याजवळील पंत अमात्य बावडेकरांच्या वाड्यात तिचे मंदिर आहे. कमळावर बसलेली देवीची मूर्ती या मंदिरात आहे.

६. महाकाली (कलांबिका देवी)

महाकाली हे दुर्गेचे संहारक आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. ही रामकृष्ण परमहंसांची उपासना देवता आहे. शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकाजवळ तिचे मंदिर आहे.

७. अनुगामिनी (अनुगाई देवी)

ही नवदुर्गांमधील सातव्या क्रमांकाची देवता आहे. ‘गम’ म्हणजे जाणे आणि ‘अनु’ म्हणजे पाठीमागून. रंकाळा टॉवर परिसरात तिचे मंदिर आहे. ही देवी कोल्हापूरबाहेर मृत होणाऱ्या आत्म्याला पाठीमागून जाऊन मुक्ती देते, असे मानले जाते.

८. गजलक्ष्मी (गजांबिका देवी)

नवदुर्गांमधील आठवी देवता गजलक्ष्मी किंवा गजांत लक्ष्मी आहे. तोरस्कर चौकाजवळील कुंभार गल्ली येथे तिचे मंदिर आहे. संपन्नतेचे प्रतीक असणारी ही देवी तीन फूट उंचीच्या काळ्या पाषाणाची आहे.

९. श्रीलक्ष्मी

नवदुर्गांमधील नववी आणि शेवटची देवता श्रीलक्ष्मी आहे. राणाप्रताप चौकातील वजन मापे कार्यालयाच्या प्रांगणातच तिचे मंदिर आहे. ही देवता संपत्ती आणि आरोग्य देणारी मानली जाते.

नवरात्रीच्या काळात भाविक या नवदुर्गांची यात्रा करतात. या यात्रेची सांगता नवदुर्गांमध्ये समावेश नसलेल्या दोन देवींच्या दर्शनाने होते: त्र्यंबुली (टेंबलाई) आणि कात्यानी. त्र्यंबुली देवीचे मंदिर शहराच्या पूर्वेला टेकडीवर असून ती महालक्ष्मीची सेवेकरी मानली जाते, तर कात्यानीचे मंदिर शहराच्या दक्षिणेला कळंब्यापासून पुढे आहे.