Thane Metro (Photo Credit- X)

Thane Metro: वाढत्या विस्तारामुळे ठाणे शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहे. काही मिनिटांच्या प्रवासासाठी नागरिकांना तासन् तास प्रवास करावा लागत आहे. अखेर, ठाणेकरांना या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आज, सोमवार २२ सप्टेंबर रोजी ठाण्यात मेट्रोची पहिली चाचणी (ट्रायल रन) यशस्वीपणे पार पडणार आहे. आज सकाळी १०.३० वाजता घोडबंदर येथील गायमुख येथून मेट्रो ट्रेनच्या चाचणीला सुरुवात झाली. ही चाचणी गायमुख ते पूर्व द्रुतगती मार्गावरील कॅडबरी जंक्शन या १३ किलोमीटर लांबीच्या मार्गावर झाली. या चाचणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखवण्यात आला. या ऐतिहासिक क्षणाबद्दल ठाणेकरांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा

सध्या ठाण्यात मेट्रो प्रकल्प ४ (वडाळा-घाटकोपर) आणि ४ - अ (कासारवडवली ते गायमुख) ची कामे वेगाने सुरू आहेत. आज होणाऱ्या यशस्वी चाचणीमुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. शहरातील वाहतुकीचे जाळे सुधारण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी ही मेट्रो सेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

कशी असेल ठाण्याची मेट्रो? लांबी, स्टेशन आणि मार्गाची संपूर्ण माहिती

ठाणे शहराच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि वाहतूक कोंडीतून मुक्ती देण्यासाठी ठाणे मेट्रो प्रकल्प वेगाने पूर्ण होत आहे. ठाण्यात मेट्रो ४ आणि मेट्रो ४ अ या दोन मार्गीकांवर काम सुरू आहे. जाणून घेऊया या प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती.

ठाणे मेट्रो प्रकल्पाची लांबी आणि एकूण स्टेशन

  • ठाणे मेट्रो ४ ही ३२ किलोमीटर लांबीच्या मार्गावर धावेल.
  • मेट्रो ४ अ ही २.७ किलोमीटर लांबीची आहे.
  • या दोन्ही मार्गीकांवर एकूण ३२ स्टेशन असतील.

ठाणे मेट्रोमधील प्रमुख स्टेशन

खालील प्रमुख स्थानकांचा या प्रकल्पात समावेश आहे:

  • कॅडबरी
  • माजीवाडा
  • कपूरबावडी
  • मानपाडा
  • टिकुजी-नी-वाडी
  • डोंगरी पाडा
  • विजय गार्डन
  • कासारवडवली
  • गोवानिवाडा
  • गायमुख