Blast प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - फेसबुक)

Balochistan Attack: बलुचिस्तान (Balochistan) मध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी लष्करावर भयंकर हल्ला झाला असून, मीडिया रिपोर्ट्सनुसार या हल्ल्यात किमान 20 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गेल्या दोन दिवसांत हा तिसरा मोठा हल्ला आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रांतात तणावाचे वातावरण आहे.

कव्वाली गायकांचाही मृत्यू

प्राप्त माहितीनुसार, बीएलएच्या 'फतेह' पथकाने कराचीतून क्वेट्टाकडे निघालेल्या एका लष्करी बसवर आयईडी स्फोट घडवून आणला. या स्फोटात 20 पेक्षा अधिक सैनिक जागीच ठार झाले, तर अनेक जखमी आहेत. बसमध्ये काही कव्वाली कलाकारही प्रवास करत होते. हल्ल्यात दोन कव्वाल आणि आणखी एका व्यक्तीचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा -Firing in Chicago: अमेरिकेतील शिकागोमध्ये अंदाधुंद गोळीबार; 4 जणांचा मृत्यू, 14 जखमी)

दोन दिवसांत तीन हल्ले

बीएलएने 15 आणि 16 जुलै रोजी सलग तीन हल्ले केल्याचे जाहीर केले आहे. 15 जुलैला झालेल्या हल्ल्याप्रमाणेच 16 जुलैलाही आयईडीच्या साहाय्याने दोन लष्करी वाहनांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तान सरकार किंवा लष्कराकडून अद्याप या हल्ल्यांवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी -

बलुच लिबरेशन आर्मी ही बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी बंडखोर संघटना असून, गेल्या अनेक वर्षांपासून ती पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करत आहे. बलुचिस्तान प्रांतात सध्या जोरदार असंतोष असून, स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात अशा हल्ल्यांची वारंवार पुनरावृत्ती होत आहे.