
MHADA News: कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) विरार बोळींज (जिल्हा पालघर) व चितळसर मानपाडा (जिल्हा ठाणे ) येथील गृहनिर्माण प्रकल्प परिसरातील ७१ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठीच्या ई-लिलावाकरिता मुदतवाढ देण्यात आली असून सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदारांना https://eauction.mhada.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम ऑनलाईन भरणे या प्रक्रियेसाठी आता दि. १० ऑक्टोबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सदर लिलावात विरार बोळींज (जिल्हा पालघर) येथील ४४ अनिवासी गाळे व चितळसर मानपाडा (जिल्हा ठाणे ) येथील २७ अनिवासी गाळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दि. १५ ऑक्टोबर, २०२५ दुपारी १.०० वाजेपासून संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलाव www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे. दि. १६ ऑक्टोबर, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी दिली.
कोकण मंडळातील अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी https://eauction.mhada.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे यासाठी दि. १० ऑक्टोबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दि. १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. अनामत रक्कम दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदारांना भरता येणार आहे.
ई लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय ई लिलावासाठी अर्ज करतेवेळी १८ वर्षापेक्षा जास्त असावे, अर्जदाराने महाराष्ट्र राज्यातील सन २०१८ नंतर काढलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असून ऑफसेट किंमतीनुसार विहित अनामत रक्कम भरणे गरजेचे आहे.
सदर लिलावाबाबत विस्तृत पात्रता निकष, प्रत्येक गाळ्याचे विवरण, सामाजिक आरक्षण व अर्ज करण्याची कार्यपद्धती, सविस्तर अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज सूचना,माहितीपुस्तिका याबाबतची माहिती https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या संकेतस्थळावरील Lottery>Eauction>eauction या पोर्टलवर उपलब्ध आहे. अर्जदाराने संकेतस्थळावरील व माहिती पुस्तिकेतील सविस्तर सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.