सोलापूर शहरात आज 40 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश
Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

सोलापूर (Solapur)  शहरात आज 40 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यात महापालिकेच्या प्रमुख व त्यांचे पती आणि शहरातील एका आमदाराच्या बंधूचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेचे नगरसेवक आणि कर्मचारी हादरले आहेत. आज आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 36 पुरुष व 4 महिलांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यातील 543 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सोलापुरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1080 झाली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माहिती दिली आहे. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात 90 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मंगळवारी सोलापूर जिल्ह्यातील 48 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. (हेही वाचा - Cyclone Nisarga Live Tracker And News Updates: निसर्ग चक्रीवादळामध्ये पुढे काही वेळातच लॅन्डफॉल होण्याची शक्यता; मुंबई, ठाण्यात दिसणार प्रभाव)

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 7860 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी 6780 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच 1080 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय आतापर्यंत 447 जण कोरोना मुक्त झाले आहेत. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 156 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 116 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सोलापूर शहरात तसेच जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.