Chardham Yatra (Photo Credits: Twitter)

चारधाम यात्रेदरम्यान (Chardham Yatra 2024) धामांच्या 50 मीटर परिसरात भाविकांना रील (Reel) बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही काही भाविक नियमांचे उल्लंघन करत आहेत. डीजीपीच्या कठोरतेनंतर आता उत्तराखंड पोलीस रील बनवणाऱ्यांवर कडक कारवाई करत आहेत. रील बनवणाऱ्यांचे मोबाईल जप्त केले जात आहेत, त्यांनी शूट केलेले रील हटवले जात आहेत आणि त्यांना दंडही ठोठावला जात आहे. गढवाल आयजी करण सिंह नागन्याल यांनी दिलेल्या माहितीनुसार, चमोली जिल्ह्यात आतापर्यंत 70 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच केदारनाथ मार्गावरही 66 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशाप्रकारे जवळजवळ 136 जणांवर कारवाई झाली आहे.

धार्मिक स्थळांची मर्यादा आणि पावित्र्य राखण्यासाठी प्रशासनाने रीलवर बंदी घातली आहे. यंदा 10 मे पासून चारधाम यात्रेला सुरुवात झाली. प्रवाशांसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र वाढत्या गर्दीमुळे बनावट नोंदणीची प्रकरणेही समोर येत आहेत.

आयजी गढवाल म्हणाले की, काही लोक ॲप संपादित करून बनावट नोंदणी करत आहेत. आतापर्यंत हरिद्वार, उत्तरकाशी आणि रुद्रप्रयागमध्ये बनावट नोंदणीचे 45 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. या प्रकरणांची चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. कडाक्याच्या उन्हातही उत्तराखंडमध्ये भाविकांचा महापूर आला आहे. आतापर्यंत 4,67,908 यात्रेकरू केदारनाथला पोहोचले आहेत. 24 मे पर्यंत 2,40,259 यात्रेकरूंनी बद्रीनाथला भेट दिली आहे. यमुनोत्री आणि गंगोत्री देवस्थानांवरही मोठी गर्दी दिसून आली, जिथे अनुक्रमे 1,97,494 आणि 1,88,993 भाविक पोहोचले आहेत. (हेही वाचा: Reels Craze in Bihar: उत्तरपत्रिका तपासताना रिल बनवणे भोवले, बिहारमध्ये शिक्षकेविरुद्ध एफआयआर दाखल)

दरम्यान, पावसाळ्यात केदारनाथ हेली सेवेसाठी तिकीट बुकिंग पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. उत्तराखंड नागरी विमान वाहतूक आणि विकास प्राधिकरणाने यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी हेली कंपन्यांना वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. यावेळी सरकारने केदारनाथ हेली सेवा तिकीट बुकिंग 10 मे ते 20 जून, 15 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान उघडली होती. जूनची तिकिटे लगेच बुक झाली, पण सप्टेंबर-ऑक्टोबरसाठी थोडा वेळ लागला.