Severe Water Crisis: सोलापूर जिल्ह्यातील गावांमध्ये पाण्याचे गंभीर संकट; 15 दिवसांत एकदा टँकरने पाणीपुरवठा, प्रत्येक थेंबासाठी तळमळत आहेत लोक (Video)
Solapur Severe Water Crisis (Photo Credit : ANI)

Solapur Severe Water Crisis: उन्हाळ्याच्या या दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाण्याचे भीषण संकट (Severe Water Crisis) निर्माण झाले आहे. माळशिरस तालुक्यातील 22 गावांना 15 दिवसांतून एकदा टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याच्या टंचाईमुळे या भागातील शेतकऱ्यांनी शेती करणे बंद केल्याची माहिती मिळत आहे. परिस्थिती अशी आहे की, लहान मुलेही पाण्यासाठी एवढी हतबल झाली आहेत की ते शाळेतही जात नाहीत आणि पाणी येण्याची वाट पाहत आहेत.

सोलापूरच्या स्थानिक रहिवासी मालनबाई यांनी माध्यमांना सांगितले की, ‘आम्हाला 15 दिवसांनी एकदा पाणी मिळत आहे. खाटेखाली भांडी ठेवून आंघोळ करतो आणि उरलेल्या पाण्याने कपडे धुतो. दिवसाला 20 रुपये देऊन पिण्याचे पाणी मिळते. परिस्थिती अशी आहे की, जेव्हापासून मी लग्न करून या गावात आले, तेव्हापासून नेते मत मागण्यासाठी येतात, पण निवडणुकीनंतर ते इकडे फिरकत नाहीत.’

माहितीनुसार, फेब्रुवारीपासून लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना खासगी संस्थांच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. अशा स्थितीत परिसरात दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत आहे. इथे लोक पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तळमळत आहेत आणि असे किती दिवस ते तळमळणार आहेत याचे उत्तर नाही.

पहा व्हिडिओ-

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील तीन गावांनी आपल्या भागातील पाणीटंचाईकडे सरकार आणि सर्व पक्षांच्या नेत्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. सोलापूर मतदारसंघातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गुड्डेवाडी आणि अंकलगी गावातील 2,500 हून अधिक मतदारांनी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यावर (19 एप्रिल) बहिष्कार टाकला होता. जवळच असलेल्या  अलगी गावातील 1,557 मतदारांपैकी केवळ शंभर मतदारांनी मतदान केले. (हेही वाचा: Maharashtra Heatwave: कोकणासह मराठवाड्यात उष्णतेची लाट, नागिरकांना काळजी घेण्याचे आवाहन)

दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील निवडणूक सभेत लोकांना मतदान करण्याचे आवाहन करताना म्हटले होते की, देशाने काँग्रेसला 60 वर्षे देशावर राज्य करण्याची संधी दिली. या 60 वर्षांत जगातील अनेक देश पूर्णपणे बदलले, पण काँग्रेसला शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवता आले नाही. 2014 मध्ये, सुमारे 100 सिंचन प्रकल्प होते जे अनेक दशकांपासून प्रलंबित होते, त्यापैकी 26 प्रकल्प महाराष्ट्रातील होते. 2014 मध्ये सरकार स्थापन केल्यानंतर मी माझी संपूर्ण शक्ती या सिंचन प्रकल्पांवर केंद्रित केली. काँग्रेसचे प्रलंबित 100 पैकी 63 प्रकल्प आम्ही पूर्ण केले आहेत. प्रत्येक शेतात आणि प्रत्येक घरात पाणी पोहोचवणे हे माझ्या आयुष्यातील एक मोठे ध्येय आहे.’