मे महिन्याला सुरूवातीलाच उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यातच हवामान खात्याने पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. या आठवड्यामध्ये राज्यात उष्णतेची लाट (Heat Wave) कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने (Weather Department) वर्तवली आहे. वाढत्या उष्णतेमुळे राज्यात उष्माघाताचे रुग्ण देखील वाढत आहेत. त्यामुळे उष्णतेची लाट लक्षात घेता नागिरकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे. नागिरकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये, सुती कपड्यांचा वापर करावा, जास्तीत जास्त पाणी प्यावी, असे आवाहन केले जात आहे. (हेही वाचा - Maharashtra Weather Update : काळजी घ्या! राज्यात उष्णतेच्या लाटेचा 'रेड अलर्ट', 'या' भागात असणार हवामानाची विचित्र स्थिती)
राज्यातील उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये उष्णतेची लाट कायम राहील. मुंबईमध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान हे 27 अंश सेल्सिअस इतके राहिल. कोकणात उष्ण आणि दमट असे वातावरण राहिल.
एकीकडे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भामध्ये सध्या कमाल आणि किमान तापमान सामान्य आहे. याठिकाणी उष्णतेची लाट देखील सामान्यच राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. भारतातील हवामान खात्याने देशभरातील वाढत्या तापमानामुळे अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.