Aadhaar Card

Aadhaar Card Update: आजकाल सोशल मीडियावर आधार कार्डाबाबत (Aadhaar Card) अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. विशेषत: इंस्टाग्राम रील्स आणि यूट्यूब शॉट्सवर ही बातमी मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे की, जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपासून अपडेट केले नाही तर 14 जूननंतर ते निरुपयोगी होईल किंवा बंद होईल. अशा परिस्थितीत तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की 14 जूननंतर तुम्ही तुमचे आधार कार्ड वापरू शकणार आहात की नाही? सर्वप्रथम, आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण या बातमीत काहीही तथ्य नाही.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ने अनेक वेळा आधार कार्ड अपडेट करण्याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, जर तुम्ही तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपासून अपडेट केले नसेल, तर UIDAI कडून आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा मोफत दिली जात आहे. तुम्ही UIDAI पोर्टलवर जाऊन 14 जूनपर्यंत तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करू शकता.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्ही UIDAI वेबसाइट किंवा आधार केंद्राला भेट देऊ शकता. मात्र, 14 जूनपर्यंत यासाठी तुम्हाला UIDAI पोर्टलवर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. पण आधार ऑनलाइन अपडेट करण्याची मोफत सेवा फक्त UIDAI पोर्टलवर उपलब्ध आहे. पण जर तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर गेलात तर तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल. (हेही वाचा: Human Milk: मानवी दुधाची विक्री किंवा त्यावर प्रक्रिया करण्यास बंदी; उल्लंघन केल्यास होणार कारवाई- FSSAI)

तुम्हाला तुमचे 10 वर्ष जुने आधार कार्ड मोफत अपडेट करायचे असल्यास, हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. कारण 14 जूनची अंतिम मुदत आहे. मुदत संपल्यानंतर तुम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागू शकतात. मात्र, 14 जूननंतरही 10 वर्षे जुने आधार कार्ड बंद होणार नसल्याचेही UIDAI ने स्पष्ट केले आहे. ते पूर्वीप्रमाणे वापरले जाऊ शकते. फक्त तुम्हाला 14 जून नंतर आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा मिळणार नाही.