Sperm and egg (Photo Credits: Flickr, Maria Mellor)

संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाला गेल्या काही वर्षांत भारतासह जगातील अनेक देशांमध्ये शुक्राणूंच्या संख्येत (Sperm Counts) लक्षणीय घट झाल्याचे आढळून आले आहे. संशोधकांनी नोंदवले की, शुक्राणूंची कमी संख्या केवळ मानवी प्रजननक्षमतेचेच नव्हे, तर पुरुषांच्या आरोग्याचे देखील सूचक आहे. शुक्राणूंच्या कमी पातळीमुळे जुनाट आजार, टेस्टिक्युलर कॅन्सर आणि आयुर्मान कमी होण्याचा धोका असतो, असे संशोधकांनी सांगितले.

ही घट आधुनिक पर्यावरण आणि जीवनशैलीशी संबंधित जागतिक संकट दर्शवते, ज्याचा मानवी प्रजातींच्या अस्तित्वावर व्यापक परिणाम होतो, असे ते म्हणाले. ह्युमन रिप्रॉडक्शन अपडेट जर्नलमध्ये मंगळवारी प्रकाशित झालेल्या या अभ्यासात 53 देशांमधील डेटा वापरण्यात आला आहे. यामध्ये सात वर्षांच्या (2011-2018) कालावधीतील डेटाचा अतिरिक्त संग्रह देखील समाविष्ट आहे, जे विशेषतः दक्षिण अमेरिका, आशिया आणि आफ्रिका यांसारख्या याआधी कधीही पुनरावलोकन न केलेल्या प्रदेशांमधील पुरुषांमधील शुक्राणूंच्या संख्येवर लक्ष केंद्रित करते.

डेटावरून असे दिसून आले आहे की या प्रदेशात राहणार्‍या पुरुषांना एकूण शुक्राणूंची संख्या (TSC) आणि शुक्राणूंच्या एकाग्रतेत घट झाली आहे, जे पूर्वी उत्तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये दिसून आले होते. हा अभ्यास जागतिक स्तरावर TSC आणि SC मध्ये 2000 नंतरची झपाट्याने घट दर्शवितो. (हेही वाचा: प्रथमच मानवी शरीरात चढवण्यात आले प्रयोगशाळेत विकसित केलेले रक्त; निकालांवर लागले संपूर्ण जगाचे लक्ष)

इस्रायलमधील जेरुसलेम येथील हिब्रू विद्यापीठातील प्राध्यापक हेगाई लेव्हिन (Hagai Levine) यांनी पीटीआयला सांगितले की, ‘भारत या मोठ्या ट्रेंडचा भाग आहे. भारतात, चांगल्या डेटाच्या उपलब्धतेमुळे (आमच्या अभ्यासातील 23 अंदाजांसह, सर्वात श्रीमंत डेटा असलेल्या देशांपैकी एक), आम्ही खात्रीने सांगू शकतो की, देशातील पुरुषांच्या शुक्राणूंच्या संख्येत घट होत आहे. परंतु जागतिक स्तरावर देखील ही गोष्ट पाहायला मिळाली आहे.’ लेव्हिन पुढे म्हणाले की, एकंदरीत, गेल्या 46 वर्षांमध्ये शुक्राणूंच्या संख्येत 50 टक्क्यांहून अधिक जागतिक पातळीवरील लक्षणीय घट त्यांनी पहिली आहे, जी अलिकडच्या वर्षांत वेगाने झाली आहे.

सध्याच्या अभ्यासात शुक्राणूंची संख्या कमी होण्याच्या कारणाबाबत भाष्य केले नाही. अमेरिकेतील इकान स्कूल ऑफ मेडिसीनमधील प्रोफेसर शाना स्वान यांनी सांगितले की, शुक्राणूंची संख्या कमी झाल्याचा परिणाम केवळ पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होत नाही. पुरुषांच्या आरोग्यावर त्याचा अधिक गंभीर परिणाम होतो.