IND W vs SL W: ३० सप्टेंबरपासून महिला वर्ल्ड कप २०२५ ला सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने श्रीलंकेला ५९ धावांनी पराभूत करत स्पर्धेची धमाकेदार सुरुवात केली. गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४७ षटकांत २६९ धावा केल्या आणि श्रीलंकेसमोर २७० धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरादाखल श्रीलंका २११ धावांवर गारद झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याचा निकाल डीएलएस (DLS) पद्धतीनुसार लावण्यात आला. Team India Schedule: ब्रेक नाही! आशिया कपनंतर लगेच टीम इंडिया मैदानात; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

अमनजोत कौरचा विक्रम

एकवेळ भारतीय संघाची धावसंख्या १२४ धावांवर ६ विकेट अशी होती. त्यावेळी युवा अष्टपैलू खेळाडू अमनजोत कौरने मोलाचे योगदान दिले. तिने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५६ चेंडूंमध्ये ५७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीत तिने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. या खेळीच्या जोरावर तिने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. महिला वर्ल्ड कपमध्ये भारताच्या भूमीवर आठव्या किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करताना ५० पेक्षा जास्त धावा करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

मोडता मोडता राहिला विश्वविक्रम

अमनजोत कौरने मोठा विक्रम केला असला तरी तिला विश्वविक्रम मोडता आला नाही. वनडे क्रिकेटमध्ये आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजही दक्षिण आफ्रिकेच्या क्लो ट्रायोनच्या नावावर आहे. तिने ५१ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ५ षटकारांसह ७४ धावा केल्या होत्या. अमनजोतला हा विक्रम मोडण्यासाठी १७ धावा कमी पडल्या.

एका सुताराची मुलगी ते टीम इंडियाचा आधार

अमनजोतचा क्रिकेट प्रवास खूप प्रेरणादायी आहे. मोहालीमध्ये जन्मलेल्या अमनजोतचे वडील भूपिंदर सिंग हे एक सुतार आहेत आणि त्यांनीच तिच्यासाठी पहिली बॅट बनवला होती. सुरुवातीला तिच्या वडिलांना ती क्रिकेटमध्ये रस घेते हे आवडले नव्हते, पण आजीच्या प्रोत्साहनामुळे आणि स्वतःच्या मेहनतीमुळे अमनजोतने भारतीय संघात स्थान मिळवले. लहानपणी ती मुलांसोबत फुटबॉल, हॉकी आणि हँडबॉल देखील खेळायची.

अमनजोत कौरची कारकीर्द

२५ वर्षीय अष्टपैलू खेळाडू अमनजोत कौरने आतापर्यंत १० वनडे सामन्यांत १५५ धावा केल्या आहेत, तर १४ विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० मध्ये १६ सामन्यांत १६४ धावा आणि ७ विकेट्स तिच्या नावावर आहेत. श्रीलंकेविरुद्धची ५७ धावांची खेळी ही तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली आहे.