
Team India Schedule: आशिया कप २०२५ मध्ये भारताने जोरदार विजय मिळवला, पण ट्रॉफीच्या वादामुळे संघाने ती स्वीकारली नाही. तरीही, पाकिस्तानला अंतिम सामन्यात हरवून भारताने चाहत्यांची निराशा होऊ दिली नाही. आशिया कपनंतर काही दिवसांचा ब्रेक मिळेल असे वाटत असतानाच, भारतीय खेळाडू पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. आशिया कपचा अंतिम सामना झाल्यानंतर केवळ चार दिवसांनी, म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. टी-२० च्या धमाकेदार क्रिकेटनंतर आता कसोटीच्या रोमांचक क्रिकेटची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. बीसीसीआयने आशिया कप सुरू असतानाच या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील दुसरी मालिका
युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची ही दुसरी कसोटी मालिका असेल. यापूर्वी इंग्लंडविरुद्धची मालिका २-२ ने बरोबरीत सुटली होती, ज्यात भारताने उत्कृष्ट कामगिरी केली होती. आता गिलला आपल्या नेतृत्वाखाली विजयाचा श्रीगणेशा करण्याची संधी आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने गिलकडे संघाची धुरा सोपवण्यात आली होती.
मालिकेचे वेळापत्रक आणि ऑस्ट्रेलिया दौरा
या मालिकेतील दुसरा कसोटी सामना १० ऑक्टोबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल. हे दोन्ही सामने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारतासाठी महत्त्वाचे आहेत. ही मालिका संपल्यानंतर, आठवडाभरातच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे, जिथे तीन वनडे आणि तीन टी-२० सामने खेळले जातील. या दौऱ्यात विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे दिग्गज खेळाडू परतणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, एन जगदीसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव.