Japan's Princess Mako Marries Commoner: जपानची राजकुमारी माकोने केले सर्वसामान्य नागरिकाशी लग्न; गमावला शाही दर्जा व कोट्यावधीची संपत्ती
Japan's Princess Mako Marries Commoner (संग्रहित संपादित प्रतिमा)

प्रदीर्घ काळापासून सुरु असलेल्या वादानंतर अखेर जपानची राजकुमारी (Japan's Princess) माकोचे (Mako) चे प्रेम जिंकले आहे. राजकुमारी माकोने मंगळवारी तिचा प्रियकर, एक सर्वसामान्य नागरिक केई कोमुरोशी (Kei Komuro) लग्न केले. या लग्नामुळे माको हिने तिचा शाही दर्जा गमावला आहे. परंतु, राजकन्येचे लग्न आणि तिचा शाही दर्जा हटवणे हे जनतेच्या हातात आहे. इम्पीरियल हाऊसहोल्ड एजन्सीने कळवले की माको आणि तिचा प्रियकर केई कोमुरो यांच्या लग्नाची कागदपत्रे राजवाड्यातील अधिकाऱ्याने मंगळवारी सकाळी सादर केली.

लग्नानंतर दुपारी जोडप्याची पत्रकार परिषद पार पडली, ज्यावेळी या दोघांनीही आपले निवेदन जारी केले. या पत्रकार परिषदमध्ये पत्रकारांना प्रश्न विचारण्यास परवानगी नव्हती. एजन्सीने सांगितले की, पॅलेसच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, माको या महिन्याच्या सुरुवातीला तणावाने ग्रस्त होती, ज्यातून ती आता बरी होत आहे. तिच्या लग्नाबद्दलच्या नकारात्मक बातम्यांमुळे, विशेषतः यामध्ये कोमुरोला लक्ष्य केल्यामुळे माको खूप अस्वस्थ होती.

या लग्नानंतर कोणत्याही शाही मेजवानीचे आयोजन केले जाणार नाही किंवा इतर कोणतेही विधी होणार नसल्याची माहिती मिळत आहे. माको ही सम्राट नारुहितो यांची पुतणी आहे. तिने आणि कोमुरोने टोकियो येथील आंतरराष्ट्रीय ख्रिश्चन विद्यापीठात एकत्र शिक्षण घेतले. त्यांनी सप्टेंबर 2017 मध्ये लग्नाची घोषणा केली, परंतु दोन महिन्यांनंतर कोमुरोच्या आईशी संबंधित एक आर्थिक वाद समोर आला व त्यामुळे हे लग्न पुढे ढकलण्यात आले. मात्र, हा वाद पूर्णपणे मिटला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (हेही वाचा: इंडोनेशियाचे माजी राष्ट्रपती यांची मुलगी स्विकारणार हिंदू धर्म, जाणून घ्या का घेतला निर्णय)

30 वर्षीय कोमुरो 2018 मध्ये कायद्याचा अभ्यास करण्यासाठी न्यूयॉर्कला गेला होता व गेल्या महिन्यातच तो जपानला परतला. जपानी राजघराण्यातील शाही नियमांनुसार एका सामान्य नागरिकाशी लग्न करून, पतीचे आडनाव धारण केल्यानंतर माकोने आता तिचा शाही दर्जा गमावला आहे. पॅलेस अधिकाऱ्यांनी सांगितले की माकोने 14 कोटी येन (12.3 लाख डॉलर) स्वीकारण्यासही नकार दिला. दुसर्‍या महायुद्धानंतर राजघराण्यातील ती पहिली सदस्य आहे जिने एका  एका सामान्य व्यक्तीशी लग्न केले. यामुळे तिला भेट म्हणून कोणतेही पैसे मिळाले नाहीत.