MHADA | Facebook

मुंबई :'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांच्या एकूण ९ अर्जांवर सुनावणी घेण्यात आली.आजच्या लोकशाही दिन कार्यक्रमात श्री. संजीव जयस्वाल यांनी नागरिकांप्रती जबाबदारी, पारदर्शकता आणि न्यायप्रिय प्रशासनाचे महत्त्व अधोरेखित करत तसेच सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासत तत्परतेने निर्णय घेतले.

श्रीमती चेऊलकर यांच्या आईच्या नावे कन्नमवार नगर, विक्रोळी येथील म्हाडाच्या संक्रमण शिबिरात संक्रमण गाळा आहे. सदर संक्रमण गाळ्यात श्रीमती चेऊलकर यांची लहान भगिनी आपल्या पतीसह राहत होत्या. मात्र, बहिणीच्या निधनानंतर त्यांचे पती या संक्रमण गाळ्यामध्ये वास्तव्यास आहेत. श्रीमती चेऊलकर यांची लहान बहिणीच्या निधनानंतर त्यांचे पती यांनी पुनर्विवाह केला असून सदर संक्रमण गाळा श्रीमती सुनिता चेऊलकर यांच्याकडे हस्तांतरित करण्याबाबतची कार्यवाही करण्याचा अर्ज आजच्या लोकशाही दिनात केला होता. 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी चोवीस तासात सदर गाळा रिकामा करण्याची नोटिस बजवावी व तात्काळ पोलीस बंदोबस्तात निष्कासन कारवाई करून सदर संक्रमण गाळा दिवाळीपूर्वी श्रीमती सुनिता चेऊलकर यांच्या ताब्यात देण्याचे निर्देश मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

श्री. स्वप्निल निकम यांच्या अर्जावर सुनावणी करताना 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयस्वाल यांनी श्री. स्वप्निल निकम यांच्याकडून मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी हमीपत्र घेऊन तसेच थकित भाडे वसूल करून संक्रमण गाळ्याचा ताबा देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

श्रीमती शैला खंदारे यांनी अंधेरीतील इंदिरानगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात त्यांच्या आईचे परिशिष्ट दोन मध्ये नाव समाविष्ट करून पात्रता निश्चित करणेबाबत आजच्या लोकशाही दिनात अर्ज केला. लोकशाही दिनात सदर अर्ज प्राप्त झाल्याचे निदर्शनास येताच आजच्या सुनावणीपूर्वी मुंबई मंडळाचे भूव्यवस्थापक श्री. रेडेकर यांनी सदर प्रकरणाची दखल घेत सादर अर्जावर दि. १४ ऑक्टोबर, २०२५ रोजी सुनावणी ठेवल्याचे पत्र यापूर्वीच संबंधित अर्जदार यांना दिले. श्री. रेडेकर यांनी तत्परतेने सदर प्रकरणी कार्यवाही केल्याबद्दल म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेबाबत समाधान व्यक्त केले.

आजच्या लोकशाही दिनात मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाशी संबंधित ४, कोकण मंडळाशी संबंधित ३, मुंबई मंडळाशी संबंधित २ अशा एकूण ९ अर्जांवर सुनावणी घेण्यात आली.