Man Rides Scooter With 7 Children: मुंबईमध्ये सात अल्पवयीन मुलांना घेऊन हेल्मेटशिवाय स्कूटर चालवताना दिसली व्यक्ती; पोलिसांनी दाखल केला गुन्हा (Watch Video)
Man Rides Scooter With 7 Children (Photo Credit Twitter)

एका स्कूटीवर (Scooter) साधारणपणे किती लोक बसू शकतात? दोन किंवा तीन, अगदीच प्रयत्न करून बसायचे म्हटले तर चार जण. परंतु महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये (Mumbai) एक माणूस सात अल्पवयीन मुलांना घेऊन स्कूटी चालवत असल्याचे दिसले आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ मुंबईच्या ताडदेव पोलीस स्टेशन परिसरातील आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती सात मुलांसह स्कूटी चालवत असल्याचे दिसत आहे.

यातील दोन मुले स्कूटीच्या फूटबोर्डवर, तीन मुले मागच्या सीटवर बसलेली आहेत आणि एक मुलगा हँडल धरून मागे उभा आहे. एवढेच नाही तर त्या व्यक्तीने हेल्मेटही घातलेले नाही. इतक्या मुलांना गाडीवर बसवून ही व्यक्ती रस्त्यावर आरामात स्कूटी चालवत आहे. ही घटना रस्त्यावरील इतर लोकांनी आपल्या मोबाईल फोन कॅमेऱ्यात कैद केली आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ 20 जूनचा आहे, जो सुहेल कुरेशी नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केला आहे. त्यांनी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना टॅग करत कारवाईची मागणी केली.

हा व्हिडीओ इतक्या वेगाने व्हायरल झाला की, मुंबई पोलिसांना या व्हिडीओची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि या व्यक्तीविरुद्ध ताडदेव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 308 (दोषी हत्येचा प्रयत्न) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या व्यक्तीवर मुलाचा जीव धोक्यात घालण्याचा आरोप केला आहे. रविवारी मुंबई पोलिसांनी आरोपीचा चेहरा अस्पष्ट असलेला फोटो ट्विट केला. पोलिसांनी आरोपी स्कूटी चालकाला अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले. (हेही वाचा: Sanitation Worker's Death In Kandivali: मॅनहोल सफाई कर्मचार्‍याच्या डोक्यावरून गेली चारचाकी, उपचारादरम्यान मृत्यू; कंत्राटदार, कार चालकाला अटक)

दरम्यान, राज्य परिवहन आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, 2022 मध्ये महाराष्ट्रामध्ये रस्ते अपघातांमुळे अंदाजे 15,000 मृत्यू झाले. या दुःखद घटनांपैकी निम्म्याहून अधिक एकूण 7,700 मृत्यू, दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तींचे होते. यातील बहुतांश मृत्यू हेल्मेट न घालल्यामुळे डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे झाले आहेत. कोविड-19 साथीच्या आजारापूर्वी 2019 मध्ये नोंदवलेल्या आकडेवारीच्या तुलनेत 2022 मध्ये रस्ते अपघातांच्या संख्येत सुमारे 2,000 ची वाढ झाली आहे.