Ola Reduces Prices of S1X Variants: ओलाने कमी केल्या आपल्या एस1 एक्स व्हेरिएंटच्या किंमती; सर्वात स्वस्त स्कूटर आता 69,999 रुपयांना मिळणार, जाणून घ्या सविस्तर
Ola Reduces Prices of S1X Variants (संग्रहित संपादित प्रतिमा)

Ola Reduces Prices of S1X Variants: देशातील आघाडीची इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric) 15 एप्रिल रोजी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये कंपनीने आपल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आणखी कमी केली आहे. ओला इलेक्ट्रिकने S1x स्कूटरची किंमत 4,000 ते 10,000 रुपयांनी कमी केली आहे. ही किंमत कपात सर्व व्हेरिएंटमध्ये करण्यात आली आहे. OLA S1X या वर्षी फेब्रुवारीमध्ये लॉन्च करण्यात आली होती, ज्याची किंमत रेंज 79,999 ते 1,09,999 दरम्यान ठेवण्यात आली होती.

आता ओला इलेक्ट्रिकचे मुख्य विपणन अधिकारी अंशुल खंडेलवाल यांनी सांगितले की, कंपनीच्या एंट्री-लेव्हल स्कूटरच्या किमती तात्काळ प्रभावाने कमी करण्यात आल्या आहेत, ज्याची डिलिव्हरी पुढील आठवड्यात सुरू होईल.

OLA S1X तीन बॅटरी पॅकसह येते, ज्यामध्ये 2 kWh, 3 kWh आणि 4 kWh समाविष्ट आहे. 2 kWh मॉडेलची प्रारंभिक किंमत 69,999 रुपये आहे, तर 3 kWh मॉडेलची किंमत 84,999 रुपये आहे, तर 4 kWh मॉडेलची किंमत 99,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 2 kWh आणि 4 kWh मॉडेलच्या किमतीत 10,000 रुपयांची कपात झाली आहे, तर 3 kWh मॉडेलच्या किमतीत 5,000 रुपयांची घट झाली आहे. अशाप्रकारे आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करून, कंपनीने सांगितले की ज्या ग्राहकांना पेट्रोलवरून इलेक्ट्रिककडे वळायचे आहे त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. (हेही वाचा: Toyota Urban Cruiser Taisor SUV भारतामध्ये झाली लॉन्च; बुकिंग सुरू वितरण मे 2024 पासून)

दरम्यान, ओलाने आजच्या कार्यक्रमादरम्यान त्यांच्या इतर इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतींची माहिती दिली आहे. कंपनीच्या मते, आता S1 Pro 1.30 लाख रुपये, S1 Air 1.05 लाख रुपये आणि S1x+ 85 हजार रुपये किमतीत खरेदी करता येईल. कंपनीने माहिती दिली आहे की त्यांच्या सर्व स्कूटर ऑनलाइन पद्धतीने तसेच जवळच्या शोरूमला भेट देऊन बुक करता येतील. यासोबतच स्कूटरची फीचर्स आणि किमतीची माहिती एक्सपिरियन्स सेंटरला भेट देऊन मिळवता येईल.