Online Taxi Service (Photo Credits: Pixabay)

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आता सरकार कडून 'सहकार टॅक्सी' (Sahkar Taxi) सुरू केली जाईल अशी घोषणा केली आहे. ओला, उबर प्रमाणे ही ride-hailing service असणार आहे. लोकसभेमध्ये बोलताना शाह म्हणाले की, हा उपक्रम पंतप्रधानांच्या "सहकार से समृद्धी" या घोषणेशी सुसंगत आहे. "येत्या काही महिन्यांत, आम्ही उबर आणि ओलाच्या धर्तीवर मोठ्या प्रमाणात सहकारी टॅक्सी सेवा सुरू करू," असे ते म्हणाले.

सरकारच्या या सहकारी संस्थेचा नफा व्यावसायिकांना जाणार नाही तर थेट चालकांना मिळेल. "आम्ही हे मॉडेल प्रत्यक्षात आणत आहोत," असे अमित शाह यांनी जाहीर केले आहे. राइड-हेलिंग प्लॅटफॉर्ममध्ये दुचाकी टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि चारचाकी वाहने यांचा समावेश असणार आहे.

जून 2022 मध्ये, केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेली एक सर्वोच्च सहकारी संस्था असलेल्या राष्ट्रीय पर्यटन आणि वाहतूक सहकारी महासंघाने अशाच प्रकारची कॅब-हेलिंग सेवा जाहीर केली.

किंमतीच्या तफावतींच्या आरोपांनंतर, ओला आणि उबर या प्रमुख राइड-हेलिंग प्लॅटफॉर्मवर वाढती तपासणी सुरू असताना ही घोषणा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी यूजर आयफोन किंवा अँड्रॉइड डिव्हाइसद्वारे बुकिंग करत आहे की नाही यावर आधारित राईडचे भाडे बदलते असे वृत्त समोर आल्यानंतर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) अलीकडेच दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावल्या आहेत.

ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या प्रकरणावर बोलताना अशा भिन्न किंमतींना "अयोग्य व्यापार पद्धत" असे संबोधले. त्यांनी पुढे घोषणा केली की सरकार संभाव्य शोषणकारी पद्धतींपासून ग्राहकांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी अन्न वितरण आणि ऑनलाइन तिकीट प्लॅटफॉर्मसह इतर क्षेत्रांमध्ये किंमत धोरणांची चौकशी वाढवेल.