Tech Mahindra Jobs: टेक महिंद्रामध्ये फ्रेशर्ससाठी मोठ्या प्रमाणात नोकऱ्या; कंपनी FY25 मध्ये 6,000 पदवीधरांना देणार रोजगार
Representational Image (Photo Credit: PTI)

Tech Mahindra To Hire Freshers: आयटी क्षेत्रातील कंपनी टेक महिंद्रा (Tech Mahindra) या वर्षी म्हणजे 2025 च्या आर्थिक वर्षात 6000 फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे. कंपनीने आज 25 एप्रिल रोजी ही माहिती दिली. सध्या बहुतेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे आणि नवीन भरती करण्यास टाळाटाळ करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये टेक महिंद्राने फ्रेशर्स नियुक्तीचा घेतलेला निर्णय तरुणांसाठी दिलासादायक ठरू शकतो. 31 मार्च रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत टेक महिंद्राच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 795 ने घटली. त्याचवेळी, आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या 6945 ने कमी झाली.

आयटी कंपनीचे हे दुसरे असे आर्थिक वर्ष आहे जेव्हा वर्षभरात तिच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. यापूर्वी, कंपनीने आर्थिक वर्ष 2018 मध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याची माहिती दिली होती. दुसरीकडे टेक महिंद्रा व्यतिरिक्त, आत्तापर्यंत फक्त टीसीएसने सांगितले आहे की, ते आर्थिक वर्षे 2025 मध्ये सुमारे 40,000 फ्रेशर्सना नियुक्त करण्याची योजना आखत आहेत.

टेक महिंद्राचे एमडी आणि सीईओ मोहित जोशी म्हणाले, 'कर्मचाऱ्यांच्या संख्येत काही प्रमाणात कपात झाली आहे. मात्र, आम्ही सतत नवीन पदवीधरांना नियुक्त करत आहोत आणि आम्ही ते सुरू ठेऊ. आम्ही दर तिमाहीत 1500 नवीन पदवीधरांना कंपनीमध्ये समाविष्ट करण्याच्या मार्गावर आहोत, अशाप्रकारे दरवर्षी 6,000 नवीन पदवीधर आमच्यासोबत जोडले जातील. ते पुढे म्हणाले, 'आम्ही या नवीन लोकांना नवीन चीफ लर्निंग ऑफिसर अंतर्गत प्रशिक्षित करण्यासाठी एक कार्यक्रम तयार करत आहोत.' (हेही वाचा: Hiring Drive: तरुणांसाठी खुशखबर! येत्या आर्थिक वर्षात Tata Elxsi करणार 1,500 ते 2,000 फ्रेशर्स इंजिनिअर्सची भरती)

सीएफओ रोहित आनंद यांनी 25 एप्रिल रोजी  सांगितले की, 2027 पर्यंत टेक महिंद्राच्या बिझनेस टर्नअराउंड धोरणाचा एक भाग म्हणून कंपनी, नवीन कर्मचारी वर्ग तयार करणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे यावर लक्ष केंद्रित करेल. आर्थिक वर्षे 2024 मध्ये, टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो यांनीदेखील वर्षभरातील हेडकाउंटमध्ये घट नोंदवली. यावेळी टीसीएसमध्ये 13,249 कर्मचारी, इन्फोसिसमध्ये 25,994 आणि विप्रोमध्ये 24,516 कर्मचाऱ्यांची घट झाली.