Job प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

डिझाइन आणि तंत्रज्ञान सेवा प्रदाता कंपनी Tata Elxsi 2024-25 या आर्थिक वर्षात साधारण 1,500 ते 2,000 फ्रेशर्स इंजिनिअर्सची भरती करणार आहे. मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्यासाठी आयोजित कॉन्फरन्स कॉलमध्ये कंपनीने याबाबत माहिती दिली. मात्र कंपनीने असेही सांगितले की, ते नवीन लोकांना नियुक्त करताना थोडी सावधगिरी बाळगतील. येत्या वर्षातील महसूल कसा आहे यावर आधारित नियुक्त्यांचे मूल्यांकन केले जाईल. कंपनीने 2022-23 या आर्थिक वर्षात 2,135 फ्रेशर्सची नियुक्ती केली होती.

दुसरीकडे Tata Elxsi चा मार्च 2024 तिमाहीचा निव्वळ नफा 2.2 टक्क्यांनी घसरून 196.93 कोटी रुपये झाला. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीने 201.51 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. तिमाहीत ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल वार्षिक 8.1 टक्क्यांनी वाढून 905.94 कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वी याच काळात तो 837.91 कोटी रुपये होता. होते. एकूण खर्च वाढून 677.21 कोटी रुपये झाला, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 613.39 कोटी रुपये होता.

संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 साठी Tata Elxsi चा निव्वळ नफा 792.23 कोटी रुपये होता. यापूर्वी 2022-23 या आर्थिक वर्षात तो 755.19 कोटी रुपये होते. कंपनीने सांगितले की, ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल 2023-24 या आर्थिक वर्षात 13 टक्क्यांनी वाढून 3,552.14 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एका वर्षापूर्वी तो 3,144.72 कोटी रुपये होते. या कालावधीत EBITDA मार्जिन 29.5% होते. कंपनीच्या संचालक मंडळाने 31 मार्च 2024 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी 700 टक्के लाभांश देण्याची शिफारस केली आहे. (हेही वाचा: LinkedIn Top 25 Companies in India: लिंक्डइनने जारी केली यंदाची देशातील 25 सर्वोत्तम कंपन्यांची यादी; भारतात काम करण्यासाठी TCS सर्वात उत्तम)

दरम्यान, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही भारतातील आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असून, त्यांनी चौथ्या तिमाहीतील निकालांमध्ये बंपर नफा कमावला आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीने 61,237 कोटी रुपयांची कमाई केली. अशात कंपनीने देशभरातील उच्च अभियांत्रिकी संस्थांमधून हजारो फ्रेशर्सना नियुक्त केले आहे. अहवालानुसार, कंपनीने 10 हजारांहून अधिक फ्रेशर्सना जॉब ऑफर लेटर पाठवले आहेत.