Representational Image (Photo Credits: PTI)

दिवाळीच्या (Diwali 2022) कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून बसच्या दरामध्ये वाढ करण्यात येणार आहे. शुक्रवारी याबाबत माहिती देण्यात आली. वातानुकूलित 'शिवनेरी' आणि 'अश्वमेध' वर्ग वगळता सर्व बस सेवांसाठी 21 ते 31 ऑक्टोबर दरम्यान तात्पुरती भाडेवाढ केली जाईल. शुक्रवारी संध्याकाळी एक प्रेस रिलीझ जारी करून, एमएसआरटीसीने सांगितले की त्यांना पीक सीझनमध्ये 30 टक्क्यांपर्यंत भाडे वाढवण्याची परवानगी आहे, जी सहसा उन्हाळ्याच्या सुट्टीचा कालावधी आणि दिवाळी सारख्या सणांमध्ये केली जाते.

प्रेस रिलीजमध्ये नमूद केले आहे की, ‘21 ते 31 ऑक्टोबर दरम्यान बसचे भाडे 5 ते 100 रुपयांच्या दरम्यान वाढेल. ही तात्पुरती भाडेवाढ केवळ सामान्य, निम लक्झरी, स्लीपर कोच आणि शिवशाही सेवांसाठी लागू असेल. ही वाढ लक्झरी शिवशाही आणि अश्वगंधा बसेस लागू असणार नाही. ही भाडेवाढ 1 नोव्हेंबर रोजी मागे घेण्यात येईल.’

महत्वाचे म्हणजे ज्यांनी या कालावधीसाठी आधीच तिकीट बुक केले आहे त्यांना प्रवासादरम्यान भाड्यातील फरक भरावा लागेल. मात्र मासिक आणि त्रैमासिक पाससाठी ही भाडेवाढ लागू होणार नाही. दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात ‘दिवाळी स्पेशल’ 1,494 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 21 ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान या बसेस धावणार आहेत. (हेही वाचा: Deepotsav 2022: भाजप मुंबईमध्ये करणार 'दीपोत्सवा'चे आयोजन; जाणून घ्या तारीख आणि ठिकाण)

प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. सध्या औरंगाबाद विभागातून 368, मुंबई 228, नागपूर 195, पुणे 358, नाशिक 274 व अमरावती येथून 71 गाड्या सोडण्यात येतील. बसच्या आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळा बरोबरच msrtc mobile reservation App चा वापर करावा.