File Image

Cancer Vaccine For Women: जागतिक स्तरावर कर्करोग (Cancer) हा एक गंभीर आरोग्य चिंतेचा विषय आहे. दरवर्षी लाखो लोक या आजारामुळे मृत्युमुखी पडत आहेत. 2023 च्या आकडेवारीनुसार, जगभरात कर्करोगामुळे सुमारे 96 लाख ते 1 कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाइकल कॅन्सर म्हणजेच, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा जागतिक स्तरावर महिलांमध्ये सर्वात वेगाने वाढणारा कर्करोग आहे, ज्यामुळे दरवर्षी लाखो महिलांचा मृत्यू होतो. भारतात, 18.3% (123,907 प्रकरणे) दरासह गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा तिसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. अहवालानुसार, 9.1% मृत्यू दरासह महिलांमध्ये मृत्यूचे हे दुसरे प्रमुख कारण आहे. आता भारतातील महिलांना प्रभावित करणाऱ्या कर्करोगाविरूद्धची महत्त्वाची लस (Cancer Vaccine) येत्या पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होऊ शकते.

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मंगळवारी ही माहिती दिली. 9 ते 16 वयोगटातील मुलींना या लसीचा फायदा होईल. ही कर्करोगाची लस महिलांसाठी मोठी उपलब्धी ठरू शकते. हे पाऊल केवळ रोग प्रतिबंधकच नाही तर आरोग्य सेवा आणखी मजबूत करेल. ही लस येत्या काही महिन्यांत लाखो महिलांचे प्राण वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

आरोग्य, कुटुंब कल्याण आणि आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव म्हणाले की, या लसीवरील संशोधन जवळपास पूर्ण झाले असून त्याची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. देशात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत असून या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, 30 वर्षांवरील महिलांची सरकारी रुग्णालयात तपासणी केली जाईल आणि डे केअर कॅन्सर सेंटर्सची स्थापना केली जाईल, जेणेकरून कॅन्सर लवकर ओळखता येईल. कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील सीमाशुल्कही सरकारने काढून टाकल्याचे त्यांनी सांगितले. (हेही वाचा: Prayagraj Mahakumbh 2025: महाकुंभातील पाणी आंघोळीसाठी योग्य नाही; संगमातील Faecal Coliform बॅक्टेरियाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले, CPCB अहवालातून समोर आली धक्कादायक बाब)

ही लस कोणत्या कर्करोगाचा सामना करेल, असे विचारले असता जाधव म्हणाले की, स्तन, तोंडाचा आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा सामना करण्यास मदत होईल. सध्याची आरोग्य केंद्रे आयुष केंद्रात रूपांतरित करण्याबाबत विचारले असता जाधव म्हणाले की, रुग्णालयांमध्ये आयुष विभाग आहेत आणि लोक या सुविधांचा लाभ घेऊ शकतात. ते म्हणाले की, देशात 12,500 हून अधिक आरोग्य केंद्रे आहेत आणि ती वाढवण्याचा सरकारचा विचार आहे.