प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

यूपीच्या मुझफ्फरनगर (Muzaffarnagar) जिल्ह्यातून अशी बातमी समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. येथे लग्नाच्या काही तास आधी वधू होमिओपॅथी डॉक्टर सुषुम्ना शर्मा ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करण्यासाठी गेली होती. मात्र रात्री 9 वाजेपर्यंत ती परत आलीच नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी दावा के की, ब्युटी पार्लरमध्ये तिला हृदयविकाराचा झटका आला व गंभीर अवस्थेत तिला मेरठला नेण्यास सुरुवात केली असता वाटेतच तिचा मृत्यू झाला. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. मात्र कुटुंबीयांनी जास्त काही माहिती देण्याचे टाळले व यामुळे या प्रकरणात काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्याने, वधूच्या कथित मृत्यूबद्दल कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. पोलीस आले आणि त्यांनी चौकशी सुरु केली.

पोलीस चौकशीदरम्यान, कुटुंबातील सदस्य त्यांचे जबाब बदलत राहिले. मुलीचे पोस्टमॉर्टम करण्यास सांगितले असता, कुटुंबाने नकार दिला आणि मृतदेह दाखवला नाही. यामुळे पोलिसांनी ब्युटी पार्लरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये डॉक्टर वधू तिच्या गर्लफ्रेंडसोबत निघून जात असल्याचे दिसून आले. नंतर पोलिसांनी दोघींनाही मध्य प्रदेशातून अटक केली. त्यांनतर चौकशीसाठी त्यांना न्यू मंडी कोतवाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले. वृत्तानुसार, झाशी येथील या दोन महिला रिलेशनशिपमध्ये होत्या. वधूच्या कुटुंबाला या नात्याची माहिती होती पण त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. मात्र लग्न ठरल्यानंतर वधूने तिच्या गर्लफ्रेंडसोबत पळून जाण्याचा विचार केला.

अहवालानुसार, वर मुझफ्फरनगरचा आहे, तर वधूचे कुटुंब झाशीहून आले होते. या दोघांचे लग्न सुमारे तीन महिन्यांपूर्वी ठरले होते. मंगळवारी, वधूचे कुटुंबीय लग्नासाठी मुझफ्फरनगरमध्ये पोहोचले, जे न्यू मंडी कोतवाली परिसरातील नाथ फार्म येथे होणार होते. लग्नाच्या दिवशी लग्नस्थळापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका ब्युटी पार्लरमध्ये कुटुंबीयांनी  दुपारी 4 वाजता वधूला सोडले. तीन तासांनंतर ते परत आले तेव्हा ती बेपत्ता होती. ब्युटी पार्लरच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले की, ती आधीच निघून गेली आहे. फोनवरून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन लागला नाही. (हेही वाचा: Bengaluru Woman Trap Of An Astrologer: प्रेमविवाह होईल, पण कुंडलीत दोष आहे...; 24 वर्षांची तरुणी अडकली ज्योतिषाच्या जाळ्यात; 5.9 लाख रुपये गमावले)

त्यानंतर आपली मुलगी तिच्या गर्लफ्रेंडसोबत पळून गेल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. मात्र लाजिरवाणेपणा टाळण्यासाठी, कुटुंबाने मुलीला मेरठला नेत असताना तिचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवली. लग्नाच्या चार दिवस आधी वधू आणि तिची गर्लफ्रेंड मुझफ्फरनगरला आले होते. वृत्तानुसार, गर्लफ्रेंड एका स्थानिक हॉटेलमध्ये थांबली होती. लग्नाच्या एक दिवस आधी वधूच्या कुटुंबीयांनी या गर्लफ्रेंडला पाहिले होते, परंतु कोणालाही वाटले नाही, की या दोघी पळून जातील.