Deepotsav 2022: भाजप मुंबईमध्ये करणार 'दीपोत्सवा'चे आयोजन; जाणून घ्या तारीख आणि ठिकाण

भाजपने बीएमसी निवडणुकीसाठी रणनीती आखली असून शहरातील प्रत्येक समाजापर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे विशेष लक्ष सेनेच्या बड्या नेत्यांच्या मतदारसंघावर असणार आहे.

Deepotsav 2022: भाजप मुंबईमध्ये करणार 'दीपोत्सवा'चे आयोजन; जाणून घ्या तारीख आणि ठिकाण
Diwali 2022 (संग्रहित संपादित प्रतिमा)

नवरात्रीमध्ये भाजपने (BJP) मुंबईमध्ये (Mumbai) मराठी दांडियाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता भाजप दिवाळीदरम्यान (Diwali 2022) एका मोठ्या दीपोत्सवाचे (Deepotsav 2022) आयोजन करत आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी येथील जांबोरी मैदानावर भाजपने 19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने कोरोना साथीच्या आजाराशी निगडीत सर्व निर्बंध उठवले आहेत आणि दोन वर्षांच्या कालावधीनंतर राज्यात सण उत्साहात साजरे करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. बीएमसी निवडणुकीपूर्वी, भाजप ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील वरळी मतदारसंघाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. वरळी परिसर शिवसेना समर्थकांसाठी ओळखला जातो आणि आदित्य ठाकरे 2019 मध्ये च मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यटन मंत्री म्हणून शपथ घेतली.

दीपोत्सवाच्या कार्यक्रमाबाबत भाजप नेत्यांनी सांगितले, ‘बीएमसी निवडणूक जवळ आली आहे आणि आमचे लक्ष वरळी भागावर आहे. आम्ही तिथल्या लोकांपर्यंत पोहोचत आहोत आणि यासाठी तिथल्या लोकांसोबत दिवाळी साजरी करणे हा एक कार्यक्रम आहे. या भागात मोठ्या प्रमाणात मराठी लोकसंख्या असल्याने, दीपोत्सवाच्या कार्यक्रमात सादरीकरणासाठी आम्ही अनेक मराठी कलाकारांना आमंत्रित करणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की या कार्यक्रमाद्वारे लोक भाजपशी जोडले जातील.’ (हेही वाचा: Dhanteras 2022 Date: धनत्रयोदशी कधी आहे? तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या)

याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये भाजपने म्हटले आहे, ‘यंदाची दिवाळी मुंबईकरांनी मराठमोळ्या जोशात, ढंगात साजरी करायची आहे. आपली खाद्य संस्कृती, आपली वेशभूषा, आपल्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचा सहकुटंब आनंद लुटायचा आहे, आपण सर्व मुंबईकर आमंत्रित आहात दि. 19 ॲाक्टोबर ते 23 ॲाक्टोबर स्थळ-  जांबोरी मैदान, वरळी.’ दरम्यान, भाजपने बीएमसी निवडणुकीसाठी रणनीती आखली असून शहरातील प्रत्येक समाजापर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे विशेष लक्ष सेनेच्या बड्या नेत्यांच्या मतदारसंघावर असणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2022 04:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).